Leopard kills 25 animals at Mantha
तळणी, पुढारी वृत्तसेवा मंठा तालुक्यातील उस्वद, हानवतखेडा कानडी परिसरात गेल्या चार महिन्यांत बिबट्याने २५ जनावरांचा फडशा पाडल्याने शेतकरी, पशुपालक व ग्रामस्थ भयभित आहेत. दर दोन ते तीन दिवसांनी शेतात किंवा रस्त्यावर बिबट्याचे दर्शन होत आहे.
मंठा तालुक्यातील उस्वद, हनुमंतखेडा परिसरात सध्या कापूस वे-चणीचा हंगाम सुरू आहे. कापुस वे चणीसाठी मोठ्या संख्येने महिला शेतात जातात. मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे एकट्याने शेतात जाण्यास महिला तयार नाहीत. बिबट्याच्या भीतीने अनेक ठिकाणी कापूस वेचणीस मजूर मिळत नसल्याने कापूस झाडावर खराब होत आहे. बिबट्याने अद्याप मनुष्यावर हल्ला केला नसला तरी त्याचा सततचा वावर ग्रामस्थांमधे दहशत निर्माण करीत आहे.
वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी उस्वद गावातील शेतकरी भारत सरोदे, नवनाथ चाटे, भास्करराव जाधव, रामजी देशमुख, शिवाजी राऊत, सुरेश सरोदे, सरपंच संतोष सरोदे, रंगनाथ कांबळे, माधवराव सरोदे, बबन क्षीरसागर यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
पिंजरा लावा
उस्वद व हानवतखेडा ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी केली आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतातील विविध कामे खोळंबली असून शेतकऱ्यांना शेती करणे अडचणीचे झाले आहे.