वडीगोद्री : मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केले जात आहे. सरकारच्या माहितीनुसार २२ लाख २० हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. अशा पद्धतीने मराठा समाज ओबीसीमध्ये आल्यास ओबीसी समाजाला स्पर्धेत टिकणे कठीण होईल. ओबीसींचे आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी येथे केला.
प्रा. हाके येत्या १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आले वडीगोद्री येथे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुढे बोलताना ते म्हणाले, की मराठा समाजातील व्यक्तिंना कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसत घुसवल्या जात असल्योन ओबीसींच्या आरक्षणाबाबत समाजात मोठा असंतोष पसरला आहे.
हा लढा संविधानिक मार्गानेच पुढे नेण्याची गरज आहे. मराठा समाजाची ही शेवटची लढाई असेल तर ओबीसींची ही सुरुवात आहे,’ असे सांगत हाके यांनी २९ ऑगस्टच्या आंदोलनाचा संदर्भ देत ओबीसींच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारला लक्ष्य केले. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पद्धतीवर ही हाके यांनी टीका केली.
‘ओबीसी हा जगन्नाथा चा रथ असून त्यांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. ओबीसी समाज एकत्रितपणे उभा राहिला तर राजकीय परिस्थिती बदलू शकते,’ असा इशाराही प्रा. लक्ष्मण हाके यांनी दिला.
चार भिंतींच्या आतील विषय सार्वजनिक करू नये
नवनाथ वाघमारे किंवा मनोज जरांगे पाटील यांनी चार भिंतींच्या आतील विषय सार्वजनिक चर्चेत आणू नयेत. माता-भगिनींना या वादात ओढू नये. ओबीसी आणि मराठा समाजातील बांधवांनी जाती जातींत संघर्ष करण्याऐवजी संविधानाच्या संरक्षणासाठी एकत्र यावे. व्यक्ती, जात आणि व्यंगावरून होणारी वक्तव्ये संतापजनक आहेत. चूक झाली असेल तर ती चूक मान्य करण्यासाठीही मोठे धैर्य लागते. लोकशाही, कायदा आणि संविधानक व्यवस्था यांचा सन्मान राखणे आवश्यक आहे. प्रशासनावर दबाव आणणे, शिवीगाळ करणे किंवा झुंडशाहीची भाषा करणे योग्य नाही. अशा प्रकारांमुळे लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, असे ते म्हणाले.