Landless farm laborers face starvation
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : यंदा अनियमित पावसामुळे शेतकरीवर्ग गंभीर संकटात आहे. विविध शासकीय उपाययोजना व मदतीची चर्चा सुरू असली तरी ग्रामीण भागातील भूमिहीन शेतमजूर मात्र दुर्लक्षित राहिल्याचे चित्र आहे. यामुळे भूमिहीन शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
भोकरदन तालुक्यात सरासरीच्या पन्नास टक्क्यांच्या आसपास पाऊस झालेला दिसत आहे. सोयाबीन, मका, कापूस अशी खरिपाची पिके पावसाअभावी जळून गेलीत. रब्बीच्या पेरण्या होण्याची शक्यता अजिबात दिसत नाही. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत 'एल निनो' स्थिती अधिक मजबूत असेल असा अंदाज आहे.
अशा परिस्थितीत जिथे कुठे पाणी उपलब्ध आहे तिथे ते अतिशय काटकसरीने वापरून वाचलेलं पाणी दुष्काळी भागातील माणसे आणि जनावरे यांना पिण्यासाठी राखून ठेवलं पाहिजे. कितीही लांब अंतरावर पाण्याची वाहतूक करावी लागली तरी ती करण्याची तयारी प्रशासनाला ठेवावी लागेल. पाणी वापराबाबत काही कठोर निर्णय करण्याची गरज आहे.
ग्रामीण भागात फिरताना वयस्कर लोक १९७२ मधील दुष्काळाच्या आठवणी जागवत आहेत. त्या वेळीही पावसाअभावी पिकं सगळी सुकून गेली होती. मात्र भूगर्भातील पाणीपातळी आजच्या सारखी गंभीररीत्या खालावलेली नव्हती. १९७२ च्या दुष्काळात अन्नधान्याची मात्र तीव्र टंचाई होती. पिकांऐवजी रोजगार ठप्प झाल्याने हे मजूर उपासमारीत सापडले आहेत. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये चार आठवड्यांहून आधिक काळ पावसाने खंड दिला. परिणामी कापूस, मका, सोयाबीनच्या पिकांचे मोठे नुकसान झाले.
जलसंधारणाच्या कामाची गरज
१९७२ च्या दुष्काळात महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेच्या कामातून पाझर तलाव, (नाला बंडिंग), तळी, शेतजमिनीची बांधबंदिस्ती, छोट्या छोट्या गावांना जोडणारे रस्ते अशी अनेक उत्पादक कामे झाली. नंतरच्या पावसाळ्यात पावसाचं पाणी भूगर्भात मुरायला उपयोगी पडतील अशी ती कामं होती. त्या कामांचा तसा उपयोग पुढील काही वर्षे झालाही. कामाच्या बदल्यात मजुरीसोबतच धान्य हे या योजनेचे वैशिष्ट्य होते.
शेतमजुरांना धान्य मोफत द्या
यंदा मजुरी बुडाल्यामुळे प्रत्येक भूमिहीन शेतमजूर कुटुंबाला एकर कमी २५ हजार रुपये आर्थिक भरपाई द्यावी. मजुरांना वर्षातून किमान २०० दिवस रोजगार द्यावा अथवा बेरोजगार भत्ता मंजूर करावा. मायक्रो फायनान्स आणि विविध वित्तीय संस्थांचे शेतमजुरांवरील कर्ज माफ करावे. मजुरांच्या पाल्यांना शिक्षण मिळावे, सर्व शेतमजुरांना सरसकट दरमहा ३५ किलो मोफत धान्य द्यावे.