Lack of rain for fifteen days: Possibility of major drop in production
आन्वा, पुढारी वृत्तसेवा: भोकरदन तालुक्यातील आन्वा परिसरात जुलै महिन्याच्या आठवड्यापासून पावसाने खंड दिला. त्यामुळे खरिपाचे मका व सोयाबीन पिके करपू लागली असून शेवटच्या घटका मोजत आहेत. यंदा सुरुवातीपासूनच कमी अधिक व रिमझिम पावसावर खरीप लागवड करण्यात आली असून कसेबसे पिके बहरली असताना पंधरा दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने मका व सोयाबीन पिके कोमात गेली आहेत.
रिमझिम पावसावर शेतात जे काही पीक तगले, ते तरी हाती येईल काही का? याची चिंता शेतकऱ्यांना असून, पावसाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागून आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील मका,
सोयाबीनचे पीक हे संकटात सापडलेले आहे. यामुळे शेतकरी आपलं पीक वाचवण्यासाठी स्पिंकलरचा मदत घेत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्ध आहे, असे शेतकरी पाणी देत आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता नाही, असे शेतकरी मात्र पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहेत.
अनेक ठिकाणी भर पावसाळ्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. ज्यामुळे पावसाळा असूनसुद्धा तुषार सिंचनाच्या माध्यमातून शेतकरी आपल्या पिकांना पाणी देत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सतत पाऊस पडत होता, परंतु इतका मोठा खंड कधीच पडलेला नव्हता, त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट निर्माण होईल अशी भीती व्यक्त करत आहेत.
यंदा कमी पावसामुळे वाढली चिंता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काहीसा झालेल्या पावसाने पिके जोमात होती, परंतु पंधरा दिवस उलटून गेले तरी पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांची वाढ खुंटली असून पिके करपू लागली आहेत. त्यामुळे वरुणर-ाजाची कृपा न झाल्यास पिकांचे नुकसान आणि कर्ज परतफेड अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.