Kharif sowing  
जालना

Jalna Kharif sowing | जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी गाठला पन्नास टक्क्यांचा टप्पा

६ लाख ५१ हजारांपैकी ३ लाख १८ हजार हेक्टरवर झाली पेरणी

पुढारी वृत्तसेवा

जालना : जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ६ लाख ५१ हजार १७४ हेक्टर एवढे असून त्यापैकी ३ लाख १८ हजार ७७० हेक्टरवर पेरण्या आटोपल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात एकूण १६२ मि.मी. पाऊस झाल्याने किमान ५० टक्के पेरण्या झाल्या असून गतवर्षी ४ लाख ५४ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या.

जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने यावर्षी पेरण्या काहीशा लांबल्या. त्यात जूनच्या शेवटच्या तीन दिवसांत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या, परंतु पेरण्यांसाठी आवश्यक पाऊस नसतानाही पेरण्यांची कामे सुरू करण्यात आली. नंतर पावसाने हजेरी लावून पेरण्यांना वाट मोकळी करून दिली.. आठवड्यात जून महिन्याच्या शेवटच्या पावसाने हजेरी लावल्यानंतर जमिनीत पुरेशी ओल निर्माण होताच शेतकऱ्यांची पेरण्यांसाठी लगबग सुरू झाली. जून महिना कोरडा गेल्याने रोहिण्या, मृग नक्षत्र कोरडे गेले.

आर्द्रा नक्षत्राने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिला. २५ जूनपासून जिल्ह्यात खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात झाली. आतापर्यंत १६० मि.मी. झालेला पाऊस पेरण्यांसाठी पुरेसा असल्याचे गृहीत धरून शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला वेग दिला आहे. अनेक शेतकऱ्यांनी जूनमध्येच धूळपेरणी केली होती, त्यांनाही पाऊस नसल्याने चिंता लागली होती. परंतु उशिरा का होईना पाऊस पडल्याने धूळपेरणी केलेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला जिल्ह्यात यावर्षी कापूस आणि सोयाबीन या पिकांवर भर दिल्याचे पहावयास मिळत आहे.

जिल्ह्यात कापसाचे एकूण क्षेत्र ३ लाख २२ हजार ३२६ हेक्टर एवढे असून त्यापैकी १ लाख ६७ हजार ५० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. सोयाबीनचे १ लाख ८१ हजार ५७५ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी १ लाख ०२ हजार ३४७ हेक्टरवर सोयाबीनच्या पेरणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात ५० टक्के पेरण्या झाल्या असून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भीज पाऊस पडत असल्याने शेतीची कामे काहीशी रेंगाळली आहेत. रिमझिम पडणाऱ्या पावसाने विश्रांती दिल्यास उर्वरित पेरणी पूर्ण होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT