जालना ः युद्धजन्य परिस्थितीत परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केला. शुक्रवारी (दि. 6) झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दुबईतील आपला अनुभव सांगत सरकारवर टीका केली.
काळे म्हणाले की, ते 28 तारखेला कौटुंबिक सहलीसाठी दुबई, युनायटेड अरब अमीरात येथे पोहोचले होते. त्यांच्या सोबत तीन कुटुंबे होती. मात्र तेथे पोहोचल्यानंतर अचानक युद्धजन्य वातावरण निर्माण झाले. इराणकडून हवाई तळांवर हल्ले झाल्याच्या बातम्या येत होत्या, तर ड्रोन हल्ल्यांमुळे परिस्थिती भीतीदायक झाली होती. काही विमानतळांवर हल्ले झाल्याने उड्डाणे बंद करण्यात आली आणि अनेक प्रवासी अडकले.
या पार्श्वभूमीवर त्यांनी भारताचे हवाई उड्डाणमंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांना ई-मेलद्वारे पत्र लिहून भारतीय पर्यटकांना मायदेशी परत आणण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला. इतर देशांनी आपल्या नागरिकांच्या परतीचा खर्च उचलला, मात्र भारत सरकारने तशी तसदी घेतली नसल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, भारतीय दूतावासाने काही प्रमाणात मदत केल्याचे सांगत जालनेकरांच्या प्रार्थनेमुळे आपण सुखरूप मायदेशी परतल्याबद्दल त्यांनी आभार मानले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांची उपस्थिती होती.
सरकारकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे
सरकारकडे ठेकेदारांची लाखो रुपयांची देणी आहे. यापूर्वी शेतकरी आत्महत्या करीत होते. आता ही वेळ गुत्तेदारावर आली आहे. 20 क्विंटलच्या मर्यादेत खरेदी करत आहे. नाफेड खरेदीची मुदत संपत आली आहे. केवळ 1 लाख क्विंटल मका खरेदी करण्यात आली आहे. बाकीचे मका कोण खरेदी करणार हा प्रश्न आहे.
तर पक्षांकडून कारवाई करण्यात येईल
मनपाच्या स्वीकृत सदस्य निवडीत काही अनियमितता झाली असेल तर पक्षाकडू योग्य ती कारवाई केली जाईल. पूर्वी पक्ष चालत नव्हता. येथे गट होते. गट पक्ष चालवीत होते. आता वॉर्डापासून पक्ष बांधणी करू. पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.