जालना : मान्सूनपूर्व सफाईची कामे कागदोपत्री झाल्यामुळेच जालना शहरातील हजारो कुटुंबीयांना विस्थापित होण्याची वेळ आली आहे. अनेक छोट्या - मोठ्या व्यावसायिकांना नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितीला जालना शहर महानगरपालिकेचा तुघलकी कारभारच जबाबदार असल्याची टीका जालन्याचे माजी आमदार तथा भाजपा नेते कैलाश गोरंट्याल यांनी केली आहे.
पावसाळ्यात जालना शहरातील जनतेला अस्मानी संकटांना सामोरे जाण्याची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी जालना शहरात महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी मान्सूनपूर्व विविध भागांतील मोठी नाले व इतर अनुषंगिक सफाईची कामे हाती घेतली जातात. यावर्षी दोन दिवसांपूर्वीपर्यंत जालना शहरात एकही मोठा पाऊस झाला नव्हता.
त्यामुळे महानगर पालिकेच्या वतीने कागदोपत्री करण्यात आलेल्या या कामांकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. मात्र, काल सोमवारी सायंकाळी व त्यानंतर रात्रभर प्रचंड विजाच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे जालना मनपाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असल्याचे सांगून गोरंट्याल यांनी जालनेकरांना त्याचा त्रास सहन करावा लागल्याचे सांगितले.
एखादा मोठा पाऊस पडला की, अख्खे भाग्यनगर जलमय होण्याचे प्रकार मागील अनेक वर्षांपासून पाहात आहोत. हे भाग्यनगरवासीयांचे भाग्य की अभाग्य असा संतप्त सवाल येथील रहिवासी उपस्थित करीत आहेत. भाग्यनगर येथील नाला बांधकामावर करोडो रुपये खर्च होऊनही परिस्थिती जैसे थे असल्याचे पावसामुळे स्पष्ट झाले आहे. चोवीस तास उलटूनही राजकीय नेत्यांची घरे पाण्यात आहेत. या परिस्थितीला जबाबदार कोण ? असा सवाल माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी उपस्थित केला आहे.
मागील तीन वर्षांपासून मान्सूनपूर्व सफाईची कामे करण्याचा ठेका एकाच व्यक्तीला देण्यात आला आहे. शहरातील विविध भागांत उद्भवलेल्या परिस्थितीला मनपा इतकेच सदर व्यक्ती जबाबदार असल्याचा आरोप करत ज्यांना सफाईची कामे व्यवस्थित हाताळता येत नाही ते मनपाचा कारभार चालविण्याच्या गप्पा कशा करीत आहेत असा सवाल माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी उपस्थित केला आहे.