जालनाः अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाची पाहणी करताना माजी आमदार कैलास गोरंट्याल, भाजपाचे शहर जिल्हा अध्यक्ष भास्कर दानवे, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत आदी. pudhari photo
जालना

Jalna Water Supply Scheme : जनतेला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा करणार

माजी आ. गोरंट्याल : अंबड येथील टप्पा -२ योजनेचे काम अंतिम टप्प्यात, दररोज किमान ४० एमएलडी पाणी मिळणार

पुढारी वृत्तसेवा

जालना : जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेच्या टप्पा - २ अंतर्गत अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रात सुरू असलेले काम जवळपास पूर्ण होत आले असून जालना शहरातील जनतेला डिसेंबर महिन्याच्या अखेरीस आठवड्यातून एकदा नियमित व मुबलक पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती जालन्याचे माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंट्याल यांनी आज गुरुवारी अंबड येथे पत्रकार परिषदेत दिली.

जालना शहरातील जनतेला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेच्या टप्पा -२ अंतर्गत अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रात कामाला आज गुरुवारी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह भाजपाचे जालना शहर महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, अंबडचे नगराध्यक्ष केदार कुलकर्णी, पाणीपुरवठा सभापती पूनम स्वामी, नगरसेवक सिद्धिविनायक मुळे, राज स्वामी, जालना मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता तायडे, शहर अभियंता राजेश बगळे आर्दीनी भेट देऊन पाहणी केली.

या पाहणीनंतर जलशुद्धीकरण केंद्रात उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना गोरंट्याल म्हणाले की, जालना शहरातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आपण आमदार असताना जायकवाडी जालना ही ६० एमएलडीची महत्त्वाकांक्षी योजना मंजूर करून घेतली. मात्र या योजनेचे डीपीआर तयार करतांना चुकून २४ एमएलडी झाले. त्यामुळे २० एमएलडीपेक्षा अधिक पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी अडचणी आल्या.

या २० एमएलडीपैकी ४ एमएलडी पाणी अंबड नगरपालिका घेते तर योजनेदरम्यान असलेल्या डावरगावात मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी होते. त्यामुळे जालन्याला दररोज केवळ १२ ते १३ एमएलडी इतकेच पाणी उपलब्ध होते. या पाण्याचा वापर जुना जालना भागातील जनतेसाठी तर घानेवाडी येथील राष्ट्रसंत गाडगे बाबा जलाशयातून नवीन जालन्याला पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु यंदा पावसाने दगा दिल्यामुळे गाडगे बाबा जलाशयातील पाणी साठा कमी झाला असून दुष्काळ असल्यामुळे आगामी काळात पाण्याची होणारी टंचाई लक्षात घेऊन जालना मनपा प्रशासनाने आवश्यक ते नियोजन व उपाययोजना राबवण्याकडे लक्ष केंद्रित केल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले.

जनतेचे ऋण फेडण्याचा प्रयत्न : भास्कर दानवे

मनपाच्या निवडणुकीत भाजपा नेत्यांवर विश्वास टाकून मनपाची सत्ता ताब्यात दिली. अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रातील टप्पा -२ योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून याद्वारे दररोज किमान ३५ एमएलडी पाणीपुरवठा करता येणार आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस सदर काम पूर्ण होताच जालन्यातील जनतेला आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा करून जनतेचे ऋण फेडण्याची संधी मिळणार असल्याचे भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी सांगितले.

वीज बिलासाठी वर्षाला लागणार तब्बल ३६ कोटी

जायकवाडी - जालना या योजनेद्वारे शहराला दररोज १२ ते १३ एमएलडी पाणी पुरवठा करण्यासाठी वीज बिलावर प्रत्येक महिन्याला सद्यस्थितीत सुमारे १ कोटी रुपये खर्च जालना मनपाला करावा लागत आहे. याच योजनेतून दररोज ४५ एमएलडी पाणी घेतल्यास महिन्याला वीज बिलावर होणारा एक कोटीचा खर्च तब्बल ३ कोटींवर पोहचणार आहे. म्हणजेच वर्षाला वीज बिलावर तब्बल ३६ कोटी रुपये इतका खर्च करावा लागणार आहे. घानेवाडी येथील संत गाडगेबाबा जलाशय परिसरात प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्प लवकर कार्यान्वित झाल्यास वीज बिलावर होणार कोट्यवधी रुपयांचा खर्च कमी होण्यास मदत होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT