Jalna school facilities pudhari photo
जालना

Jalna school facilities : जिल्हा परिषद शाळांचा सात दिवसांत ‘पंचनामा’!

शाळांच्या वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पाणी व कंपाऊंडची सद्यस्थिती तपासा; पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

जालना : जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कंपाऊंड वॉल आदी सुविधांची सद्यस्थिती तपासून त्याचा अहवाल येत्या पाच सप्टेंबरपर्यंत सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. शाळा दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध असूनही तो अखर्चित राहता कामा नये. निविदा किंवा प्रशासकीय कार्यवाहीला विलंब झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्हा परिषद शाळांमधील नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम, जुन्या वर्गखोल्यांची दुरुस्ती, मुला-मुलींच्या स्वच्छतागृहांची स्थिती आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा यांचा आढावा पालकमंत्री मुंडे यांनी मंत्रालयीन दालनातून घेतला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारिया, जालना महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा उपस्थित होत्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांच्यासह अन्य अधिकारी दृकश्राव्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालयांच्या इमारतींची सद्यस्थिती, आवश्यक दुरुस्ती, उपलब्ध निधी आणि प्रलंबित कामांचा स्वतंत्र आढावा घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

शाळांची सद्यस्थिती तपासल्यानंतर येत्या काळत्तत जिल्हाभरातील अंगणवाडी व ग्रामपंचायत इमारतींचाही आढावा घेण्यात येणार आहे. यामुळे अंगणवाड्या आणि ग्रामपंचायत इमारतींचा अवस्था समजाणार आहे.

मैदाने पडू देऊ नका

शाळांची मैदाने वापराविना राहू नयेत. मैदानांवर मऊ लाल माती टाकून खो-खो, कबड्डी, मल्लखांब आणि बॅडमिंटनसाठी आवश्यक सुविधा निर्माण कराव्यात. विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी क्रीडांगणांचा नियमित वापर होईल, याचे नियोजन करण्यासही त्यांनी सांगितले. शाळांमध्ये तंबाखू अथवा मद्याचे सेवन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी जिल्हा परिषदेने पथक तयार करून नियमित पाहणी करावी, असेही निर्देश देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT