जालना : जिल्ह्यात शनिवार (दि. ८) आणि रविवार (दि. ९) रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यासाठी दोन दिवसांचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी ७ ऑगस्ट रोजी दिलेल्या अंदाजानुसार, ८ व ९ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. त्यानंतर १० व ११ ऑगस्ट रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
मेघगर्जनेसह वीज चमकत असताना नागरिकांनी झाडाखाली अथवा झाडाजवळ थांबू नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे टाळावे. वादळाच्या वेळी विद्युत उपकरणांचा वापर करू नये. मोकळे मैदान, विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर आणि लोंबकळणार्या तारांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, असे अवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन
अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतीमालाचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काढणीला आलेली पिके शक्य तितक्या लवकर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. काढलेला शेतमाल व्यवस्थित झाकून ठेवावा. साठवलेले धान्य सुरक्षित ठिकाणी हलवावे. तसेच शेतातील अतिरिक्त पावसाचे पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था करावी. वादळाच्या काळात जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, असे प्रशासनाने सूचित केले आहे.
जालन्यात सर्वाधिक, तर घनसावंगीत सर्वात कमी पाऊस
जालना जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या ६३.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. १ जून ते ८ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ३८४.५ मि.मी. पाऊस झाला असून, गतवर्षी याच कालावधीत ३६०.५ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्याची जून ते सप्टेंबर या कालावधीतील वार्षिक सरासरी ६०३.१ मि.मी. आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी जालना तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक ४४१.५ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ भोकरदनमध्ये ४००.६ मि.मी., बदनापूरमध्ये ३९२.५ मि.मी., मंठ्यात ३८९.७ मि.मी., परतूरमध्ये ३८३.७ मि.मी., जाफराबादमध्ये ३७० मि.मी., अंबडमध्ये ३४८.४ मि.मी. आणि घनसावंगीमध्ये ३४६.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
वार्षिक सरासरीच्या तुलनेत भोकरदन तालुक्यात आतापर्यंत ७३.३ टक्के पाऊस झाला असून, जालना तालुक्यात ६८.६ टक्के, बदनापूर ६५.६ टक्के, जाफराबाद ६३.८ टक्के, अंबड ५८.६ टक्के, परतूर ५९ टक्के, मंठा ५७.५ टक्के आणि घनसावंगीमध्ये ५४.३ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात ८ ऑगस्ट रोजी सरासरी १.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये परतूरमध्ये सर्वाधिक ३.४ मि.मी., जालना ३.१, घनसावंगी २, भोकरदन ०.९, मंठा ०.७, बदनापूर ०.५ आणि जाफराबाद ०.२ मि.मी. पाऊस झाला.