सादिक शेख
आन्वा : भोकरदन तालुक्यातील वाकडी येथील स्मशानभूमी व शेतकऱ्यांना शेतात जाणाऱ्या पाणंद रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने आणि खोल चाकांचे खड्डे पडल्याने शेतकऱ्यांना जाण्या-येण्यासाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रस्त्यावरील चिखलामुळे वाहने घसरत असून ट्रॅक्टर व इतर वाहने चिखलात अडकून पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतावर जाणे, शेतीची कामे करणे आणि पीक वाहतूक करणे कठीण झाले आहे. आधीच शेतकरी पावसाच्या अनियमिततेमुळे संकटात सापडला असताना पावसात पाणंद रस्त्याची झालेली ही दुर्दशा शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून शासन विविध योजना राबवित असून या पांणद रस्त्याचे गेल्या अनेक वर्षांपासून काम प्रलंबित आहे. तसेच मुस्लिम समाज बांधवांची या रस्त्यावर स्मशानभूमी असून पावसाळ्यात या नागरिकांना दफनविधीसाठी जाण्याकरिता मोठी कसरत करावी असून गेले काही वर्षांपासून स्थानिक ग्रामपंचायत व तहसील कार्यालयात तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या 'शेतातून पक्के पाणंद या योजनेचा प्रत्यक्षात काहीच फायदा होत नसल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे. संबंधित विभागाकडे अनेकवेळा तक्रारी व माहिती देऊनही कोणीही याची दखल घेत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. प्रशासनाने तातडीने या पाणंद रस्त्याची पाहणी करून तात्पुरता दिलासा म्हणून मुरूम टाकावा आणि लवकरात लवकर पक्क्या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्याच हीच अवस्था होते. आम्ही प्रशासनाकडे अनेकदा या रस्त्याच्या दुरुस्तीर्ची किवा खडीकरणाची मागणी केली आहे, मात्र, याकडे कायम दुर्लक्ष केले जाते. ऐन हंगामात शेतात जाता येत नसेल, तर आम्ही जगावे कसे? प्रशासनाने तत्काव यावर उपाययोजना करावी.
हंगामात वेलेत पेरणी आणि मशागत करण अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र या रस्त्याच्या दुखवस्थेमुळे बियाणे, खते आणि शेतीसाठी आवश्यक साहित्य शेतापर्यंत पोहोचविण्यात अडचणी येत आहेत. परिणामी अनेक शेतकऱ्यांची मशागतीची कामे रखडली असून उत्पादनावरही त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत असतानाही संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायत व प्रशासनाने तातडीने पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी मुस्लिम समाजासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.
वाकडी येथील मुस्लिम समाजाचे स्मशानभूमीकडे व शेतात जाणाऱ्या पाणंद रस्त्याची झालेली दुरवस्था शेतकऱ्यांची वाहतूक धोकादायक बनवत आहे. त्यामुळे प्रशासनाने या पाणंद रस्त्याचे तातडीने खडीकरण करून पक्का रस्ता तयार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.ह.भ.प केशव महाराज सिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते
काल एका मुस्लिम समाज बांधवाचा निधन झाले होते, त्याला अंत्यविधी करण्यासाठी कबरस्थानाकडे जाणारा रस्ता चिखलमय झाला आहे. वाहनात अंत्यविधी नेण्याची वेळी नागरिकांना आली. या रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकी तसेच चारचाकी वाहनांना या रस्त्यावरून जाणे कठीण झाले आहे.अक्रमखा पठाण, ग्रामस्थ वाकडी