Jalna Vishwakarma Yojana success 
जालना

Jalna Vishwakarma Yojana success |पारंपरिक कारागिरांच्या हातांना मिळाले उद्योगाचे बळ!

विश्वकर्मा योजनेची जालन्यात भरारी; कर्ज मंजुरीत जालन्याचा राज्यात चौथा क्रमांक

पुढारी वृत्तसेवा

संघपाल वाहुळकर

जालना : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील पारंपरिक कारागिरांना उद्योजकतेची नवी दिशा मिळत आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या जालना जिल्हा कार्यालयाच्या पुढाकारातून सुमारे दीड हजार कर्ज प्रस्ताव बँकांकडे सादर करण्यात आले असून, कर्ज मंजुरी २० टक्केवर असून, यात जालना जिल्ह्याने राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे.

१७ सप्टेंबर २०२३ रोजी सुरू झालेल्या या योजनेचा उद्देश पारंपरिक कारागिरांचे कौशल्य विकसित करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविणे हा आहे. योजनेंतर्गत कौशल्य प्रशिक्षण, आधुनिक साधनसामग्री, अल्प व्याजदराचे कर्ज आणि व्यवसाय विस्तारासाठी आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते.

यासोबतच सीएमईजीपी, विश्वकर्मा सुतार काम पीएमईजीपी आणि पीएम विश्वकर्मा योजनांद्वारे उद्योग उभारणाऱ्या लाभार्थ्यांना ग्रामीण भागात २५ ते ३५ टक्के, तर शहरी भागात १५ ते २५ टक्के मार्जिन मनी अनुदान दिले जाते. तसेच मधमाशी पालनासाठी मधपेट्यांवर ५० टक्के अनुदान आणि प्रशिक्षणाची सुविधाही उपलब्ध आहे. या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करून बँकेकडून कर्ज मंजूर झाल्यानंतर उद्योग सुरू करता येतो.

या योजनेत योजनेत सुतार, लोहार, सोनार, कुंभार, चांभार, गवंडी, शिंपी, न्हावी, धोबी, कुलूपकार, शिल्पकार, खेळणी बनवणारे, हार तयार करणारे, माशांच्या जाळ्यांचे निर्माते आदी १८ पारंपरिक व्यवसायांतील कारागिरांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेमुळे पारंपरिक कौशल्याला आधुनिक व्यवसायाची जोड मिळत असून, जिल्ह्यातील कारागिरांचा उद्योजकतेकडे वाढता कल दिसून येत आहे.

ज्या बँकांनी पीएम विश्वकर्मा लाभार्थीचे कर्ज वेगवेगळ्या कारणांनी नाकारले आहे त्यांचे सध्या शिबीर घेण्यात येत आहे. प्रत्यक्ष लाभार्थी आणि बँकेचे अधिकारी शिवाय एमएसएमईचे वरिष्ठ अधिकारी श्री. मिश्रा हे या शिबिरात सहभागी होणार आहे. यापूर्वी भोकरदन ४०० लाभार्थी, अंबड, आणि बदनापूर येथे शिबीर घेण्यात आले. उद्या बुधवारी जाफराबाद येथे २४० लाभार्थीना बोलावण्यात आले आहे. सुमारे २० टक्के कर्ज वाटप करण्यात आले आहे. हे कर्ज ५ टक्के व्याजदराने देण्यात येत आहे. उरलेल्या लाभार्थीना कर्ज वाटप करण्यात येणार आहे.

- विष्णू कायंदे, ज्येष्ठ पर्यवेक्षक, जालना

४ हजार कारागिरांना किट वाटप

जिल्ह्यातील प्रशिक्षण घेतलेल्या सुमारे ४ हजार पारंपरिक कारागिरांना ज्या - त्या व्यवसाय किटचे वाटप करण्यात आले आहे. पहिला टप्पा काही कारागिरांना ५० हजार ते १ लाख रुपये देण्यात आला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात १ लाख ते २ लाख रुपयांपर्यंत कर्ज वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यात सुमारे २० टक्के लाभार्थीना कर्ज वितरित करण्यात आले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT