सादिक शेख
आन्वा: भोकरदन तालुक्यासह अनेक गावातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले असून हातातोंडाशी आलेले पांढरे सोने म्हणजेच कापूस पीक पावसामुळे अक्षरशः मातीमोल झाले आहे. कापूस वेचणीचा हंगाम सुरू असतानाच पावसाने तब्बल आठवड्याभर हजेरी लावल्यामुळे वेचणीला आलेला संपूर्ण कापूस शेतात भिजून गेला आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
दिवाळीच्या काळात अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी अत्यंत कष्टाने कापसाची लागवड केली होती, आणि यंदा चांगले उत्पादन मिळण्याची आशा होती. मात्र अवकाळी पावसाच्या जोरदार हजेरीमुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरवले आहे.
पावसात भिजल्यामुळे कापसाची प्रत मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. ओला चिंब झालेला कापूस आता शेतकरी उन्हामध्ये वाळवण्याचा प्रयत्न करत असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच सततच्या पावसामळे झाडावरच कापूस खराब झाल्याने कापूस उत्पादनात घट निर्माण होण्याची शक्यता शेतकरी बांधवांनी वर्तविली आहे. एकीकडे नैसर्गिक संकट तर दुसरीकडे कर्जाचा डोंगर, अशा दहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाला आता शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा आहे.
शासनाने तात्काळ पंचनामे करून नकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहेत. भिजलेल्या कापूस व्यापारी कमीत कमी दर देतात. परिणामी शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत असून या नुकसानीमुळे लागवडीसाठी आलेला खर्चही निघणार नाही. खते, बियाणे, मजुरी यावर केलेला संपूर्ण खर्च वाया गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
दिवाळी सणानिमित्त मजूर वर्ग उपलब्ध झाला नाही. यामुळे ऐन कापूस वेचणी करण्याच्या वेळी अवकाळी पावसाने डाव साधला. यामुळे लावलेले भांडवलही गेले आणि येणारे उत्पादनही गेले. यातून वेचणीचा खर्च देखील निघणार नाही. हा कापूस घरात कुठे आणि कसा ठेवता येणार आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतात व घराबाहेर ओला झालेला कापूस सुकविण्यासाठी धडपड करीत आहे.