सादिक शेख
आन्वा : भोकरदन तालुक्यात सततच्या पावसामुळे कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. अपेक्षित दर न मिळाल्याने कपाशी पिकाचा खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त आता तूर पिकावर आहे मात्र, तूरीवरही अळी व रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे ओला दुष्काळ अन् रोगांचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांच्या खिशावर जास्तीचा आर्थिक भार टाकत आहे.
परतीचा पाऊस लांबल्याने कापूस वेचणीला अडचणी येत आहेत. परिणामी, शेताची मशागत करण्यात वेळ गेल्याने रब्बी पेरणी उशिराने होणार आहे. यामुळे रब्बी पिकांचे गणित कोलमडण्याची शक्यता आहे. यंदा कपाशीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता त्यांची केवळ तुरीच्या पिकावरच आशा आहे.
परतीच्या पावसामुळे शेतजमीन ओली झाल्याने रब्बी हंगामातील पेरणीसाठी कालावधी वाढला आहे. शेतकऱ्यांनी तण काढण्यासाठी तणनाशक फवारणी केली आहे. तर काही ट्रॅक्टरच्या साह्याने रोटवेटर करत आहेत. रब्बी पेरणीचा कालावधी शेवटच्या टप्यात असल्याने लागवड क्षेत्र अजून तयार झाले नाही. मात्र, हरभरा आणि गहू पिकाचे क्षेत्र यंदा वाढण्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तवला जात आहे.
यंदा जलसाठ्यात भरमसाठ पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे उशिरा पेरणी करूनही रब्बी हंगाम चांगला होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. खरीप हंगामातील तूरीचे पीक सध्या फुलधारणेच्या अवस्थेत असून चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना आशा पल्लवित आहे. तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे कीटकनाशकांची फवारणी शेतकरी करीत आहेत. सतत पावसाने हजेरी लावत असून सध्या ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.