स्टंटबाजी बेतली अंगाशी; अज्ञात तरुणावर गुन्हा दाखल pudhari photo
जालना

Jalna Crime : स्टंटबाजी बेतली अंगाशी; अज्ञात तरुणावर गुन्हा दाखल

मोती तलाव ः गरुड प्रतिमेवर उभा राहून तयार केला व्हिडीओ

पुढारी वृत्तसेवा

जालना : जालना शहरातील मोती बाग तलाव (चौपाटी) परिसरात महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या गरुड प्रतिमेवर चढून अज्ञात तरुणाने व्हिडिओ बनवला. हा धक्कादायक प्रकार सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे उघडकीस आला आहे. याप्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना महानगरपालिकेने मोती बाग तलाव परिसरात सौंदर्यीकरणाचा भाग म्हणून एक भव्य गरुड प्रतिमा बसवली आहे. 1 ते 4 मे या कालावधीत एका अंदाजे 20 ते 25 वर्षे वयाच्या अज्ञात तरुणाने या प्रतिमेवर बेकायदेशीरपणे चढून त्यातील काही भागांची तोडफोड केली. केवळ एवढ्यावरच न थांबता, या तरुणाने या कृत्याची व्हिडिओग्राफी करून ती सोशल मीडियावर व्हायरल केली.

महानगरपालिकेचे सफाई कामगार आरेफ बेग वहीद बेग आणि त्यांचे सहकारी मुकेश ससाने यांनी या प्रकाराची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांना गरुड प्रतिमेचा मूळ साचा आणि रंगाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून आले. जाणीवपूर्वक सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या हेतूने हे कृत्य करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी सफाई कामगार आरेफ बेग (वय 41, रा. हकीम मोहल्ला, जुना जालना) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलिसांनी सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 च्या कलम 3 आणि भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 324(3) नुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलिस निरीक्षक बाळासाहेब नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल मनसुख साहेबराव वेताळ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे शहरवासीयांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT