जालना : जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमार व पेपरफुटी व गैरप्रकारांना आळा घालण्यासह विविध मागण्यांसाठी निदर्शने करून मोर्चा काढला.  ( छाया : किरण खानापुरे)
जालना

Jalna student protest : जालन्यात विद्यार्थी व युवकांचा मोर्चा

जंतरमंतर लाठीमाराचा निषेध, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

जालना : दिल्ली येथील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराच्या निषेधार्थ तसेच देशभरात वाढत्या पेपरफुटीच्या घटनांविरोधात विद्यार्थी व युवकांनी जालना शहरात शुक्रवारी मोर्चाचे आयोजन केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मस्तगड येथून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी विविध घोषणा देत विद्यार्थ्यांनी परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

मोर्चानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत भारत सरकारला निवेदन देण्यात आले. निवेदनात जंतर-मंतर येथे लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या लाठीमाराचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. शांततेच्या मार्गाने न्याय्य मागण्या मांडणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

यावेळी आंदोलकांनी सांगितले की, देशभरात नीट, टीईटी तसेच विविध स्पर्धा व प्रवेश परीक्षांमध्ये वारंवार होत असलेल्या पेपरफुटी आणि गैरप्रकारांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, मानसिक व आर्थिक नुकसान होत आहे.

अनेक वर्षे कठोर परिश्रम करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला जात असून परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, विश्वासार्ह आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

निवेदनाद्वारे राष्ट्रीय परीक्षा एजन्सी बरखास्त करणे, नीट, टीईटी तसेच सर्व परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकारांची उच्चस्तरीय, निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करणे, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करणे, परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करणे, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, पेपरफुटीमुळे गंभीर परिणामांना सामोरे गेलेल्या व मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व न्याय द्यावा, तसेच जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवरील लाठीमाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

या मोर्चात विद्यार्थी युवक संघर्ष समितीचे जितेंद्र पाटेकर, गणेश दाभाडे, लक्ष्मीकांत पैंजने, अशोक भारती, मुजीब शेख, पूनम लांडगे, अनिल मिसाळ, जीवन दांडगे,पवन दांडगे, अंगद धनवे राजेश शिंदे, आदित्य राऊत, ईश्वर कसबे, मयूर शिरसाठ, वैजिनाथ लोंढे, ॲड. राहुल बोबडे, समाधान खरात, समाधान खाडे, निखिल खरात, शैलेश मोरे, बाबासाहेब पाटोळे सचिन लांडगे यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT