Stray Dog Pudhari File Photo
जालना

Jalna Stray Dog |पिसाळलेल्या कुत्र्याने आठ जणांचे लचके तोडले; आष्टीत भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट!

एकाच दिवशी नागरिकांमध्ये दहशत; तिघांना गंभीर दुखापत, जालना येथे उपचारासाठी केले रेफर, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी.

पुढारी वृत्तसेवा

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून, शनिवारी (ता. २९) एका पिसाळलेल्या भटक्या कुत्रीने दिवसभर धुमाकूळ घालत तब्बल आठ जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे आष्टी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुत्र्याने चावा घेतलेल्या सर्व जखमींवर आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. यापैकी तिघांना गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी जालना येथे रेफर करण्यात आले आहे.

शनिवारी सकाळच्या सुमारास एका भटक्या पिसाळलेल्या कुत्रीने अचानक आष्टी परिसरात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांसह दिसेल त्या व्यक्तीचा पाठलाग करून कुत्रीने चावा घेतला. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. काही नागरिकांनी या कुत्रीपासून बचाव करण्यासाठी धावाधाव केली, तर या घटनेमुळे लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये विशेष भीती निर्माण झाली आहे.

या कुत्रीच्या हल्ल्यात जुगलकिशोर दाड (वय ६०), यासिन शेख (वय ६५), राजू कुरेशी (वय ३५, रा. वडवणी), अन्सार शेख (वय ३२, रा. आष्टी), ईश्वर देशमुख (वय ४८, रा. ब्राह्मणवाडी), पारुबाई चव्हाण (वय ७०, रा. कणकवाडी), शुभम लहाणे (वय १७, रा. सुरुमगाव) आणि निखिल फड (रा. आष्टी) यांना कुत्र्याने चावा घेतला आहे.यातील जुगलकिशोर दाड, यासिन शेख आणि राजू कुरेशी यांना कुत्र्याने गंभीर स्वरूपाचा चावा घेतल्याने त्यांना आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जालना येथे पाठविण्यात आले आहे. इतर जखमींवर आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.

या घटनेबाबत वैद्यकीय अधिकारी उमेश साळवे यांनी माहिती देताना, कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक उपचार करण्यात आल्याचे सांगितले. गंभीर जखमी असलेल्या तिघांना पुढील उपचारासाठी जालना येथे रेफर करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर

आष्टी गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून, रस्ते, गल्लीबोळ तसेच वस्तीच्या परिसरात कुत्र्यांचे टोळके फिरताना दिसत आहे. यामुळे नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना भीती वाटत आहे. विशेषतः सकाळी शाळेत जाणारी मुले, कामानिमित्त बाहेर पडणारे नागरिक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना भटक्या कुत्र्यांपासून धोका निर्माण झाला आहे.

शनिवारी एकाच पिसाळलेल्या कुत्रीने आठ नागरिकांना चावा घेतल्याने भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे. भविष्यात अशा घटना घडून एखाद्या नागरिकाच्या जीवाला धोका निर्माण होण्यापूर्वी संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात

आष्टीतील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाने तातडीने मोहीम राबवावी. पिसाळलेल्या कुत्र्यांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे पकडावे तसेच भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

एकाच दिवशी आठ नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याने प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी तातडीने कारवाई न झाल्यास नागरिकांमध्ये आणखी भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT