जालना : पतीच्या निधनानंतर आयुष्याचा संघर्ष एकटीने पेलणाऱ्या जालना जिल्ह्यातील तब्बल 61 हजार 903 एकल महिलांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सरकारी नोंदीत त्यांचे नाव आहे, कागदपत्रेही जमा आहेत; मात्र तरीही प्रत्यक्ष आर्थिक आधार अजून मिळालेला नाही, ही बाब अनेक महिलांसाठी वेदनादायक ठरत आहे. या सर्वेक्षणात तब्बल 55 हजार 820 महिला विधवा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद जालना अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत करण्यात आलेल्या एकल महिला सर्वेक्षणातून जिल्ह्यातील सामाजिक वास्तव समोर आले आहे. जालना जिल्ह्यात एकूण 61 हजार 903 एकल महिलांची नोंद झाली असून, त्यामध्ये विधवा महिलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
घर चालवण्यासाठी रोजच्या मजुरीवर, किरकोळ कामांवर किंवा नातेवाइकांच्या मदतीवर अवलंबून राहणाऱ्या या महिलांना शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांकडून मोठी अपेक्षा आहे. सर्वेक्षणानंतर लाभ मिळेल, असा विश्वास त्यांना दाखवण्यात आला होता. मात्र महिने उलटून गेले तरी आर्थिक लाभ मिळत नसल्याने त्यांच्यात निराशा वाढत आहे.
अनेक महिलांसाठी दरमहा मिळणारे मानधन म्हणजे औषध, अन्न आणि मुलांच्या शिक्षणाचा आधार आहे. तो आधार वेळेवर न मिळाल्याने त्यांच्या जीवनातील असुरक्षितता अधिकच तीव्र होत आहे. नाव यादीत आहे, पण मदत कधी मिळणार? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. दरम्यान, एकल महिला सर्वेक्षणातून 67 शेकड्यांहून अधिक महिला 51 वर्षांवरील दिसून येत आहे.
या सर्वेक्षणामुळे जिल्ह्यातील एकल महिलांच्या समस्या, त्यांच्या आर्थिक-सामाजिक गरजा आणि शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. एकल महिलांसाठी विशेष कल्याणकारी योजना, रोजगार व सामाजिक सुरक्षितता देण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
वयोगटानुसार एकल महिलांची संख्या
वयोगटनिहाय आकडेवारीनुसार, 51 ते 65 वयोगटातील 19 हजार 348 महिला, तर 65 वर्षांवरील 24 हजार 160 महिलांची संख्या सर्वाधिक आहे. याशिवाय 31 ते 50 वयोगटातील 15 हजार 74 आणि 18 ते 30 वयोगटातील 3 हजार 321 एकल महिलांची नोंद आहे. विशेष बाब म्हणजे 18 वर्षांखालील अपत्यांची संख्या 6 हजार 798 इतकी आहे. ही माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे.
संस्थेच्यावतीने प्रयत्न- प्रशासनाने पात्र विधवा महिलांना तातडीने प्रत्यक्ष लाभ द्यावा. एकल महिलांच्या उपजिविकेसाठी संस्थेच्यावतीने प्रयत्न केले जात आहे.शिवाजी तायडे, तेजस जनविकास संस्था, चनेगाव.