जालना : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क, महसूल व पोलिस विभागाने राबविण्यात आलेल्या संयुक्त मोहिमेत अवैध कारवाया करणाऱ्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली.
यात आरटीओ कार्यालयाकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. तसेच प्रलंबित ई-चलानपोटी ८१ हजार रुपयांचा दंड बजावण्यात आला. त्यामुळे एकूण ५ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा दंड करण्यात आला.
महसूल विभागाने गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी तपासणी नाक्यांवर कारवाई केली. भोकरदन तालुक्यातील राजूर नाका येथे वाळूची अवैध वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर एक ब्रास वाळूसह पकडण्यात आला. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस विभागाकडूनही तिबंधात्मक कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १२६ अन्वये ३६ जणांवर तर कलम १२९ अन्वये ७ जणांवर, तर इतर कायद्यांतर्गत एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. एकूण ४४ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक खटले दाखल करण्यात आले. जिल्ह्यात अवैध वाहतूक, दारू विक्री तसेच इतर बेकायदेशीर कृत्यांविरोधात यापुढेही धडक कारवाई सुरू राहणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांच्यावतीने सांगण्यात आले.
नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना दंड
१६९ वाहनांची तपासणी करून ५९ वाहनांवर कारवाई करण्यात आली. ओव्हरलोड, विनापरवाना वाहतूक, विना-पीयुसी, रिफ्लेक्टर नसणे, सीटबेल्ट न लावणे तसेच विना-एचएसआरपी नंबर प्लेट आदी नियमभंगाचा समावेश आहे. या कारवाईत जागेवर ५ लाख ६ हजार ५०० रुपयांचा रोख दंड वसूल करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ९ आरोपींना अटक
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती व वाहतुकीविरोधात विविध ठिकाणी छापे टाकून ९ गुन्हे दाखल करत ९ आरोपींना अटक केली. या कारवाईत ४६.४४ लिटर अवैध देशी दारू, ४५ लिटर हातभट्टी दारू आणि २०० लिटर रसायन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३६ हजार २०० रुपये आहे.