शहागड : अंबड तालुक्यात अवैध गौण खनिज व वाळू उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध महसूल विभागाने धडक मोहीम उघडली आहे. जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हातगंल, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथक व अंबड गोंदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दोन स्वतंत्र कारवाया करत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर जप्त केलेत
मठपिंपळगाव येथील दुधना नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार विजय चव्हाण यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तलाठी स्वप्नील खरात व पथकाने लालवाडी फाटा येथे पाळत ठेवत वाळूने भरलेला एक ट्रॅक्टर पकडला. या वाहनावर कोणताही नोंदणी क्रमांक नव्हता. चालकाकडे कोणतीही वैध पावती ई-चलन आढळून आले नाही. पावती तपासणीत अवैध ठरली वाहनाला जीपीएस यंत्रणा नसल्याचे निष्पन्न झाले.
महसूल विभागाने स्वराज 744 एक्स. टि,मॉडेलचा केशरी रंगाचा ट्रॅक्टर अंदाजे १ ब्रास वाळूसह एकूण ७,०५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत ट्रॅक्टर तहसील कार्यालय अंबड येथे जमा केला. याप्रकरणी तलाठी स्वप्नील खरात यांच्या फिर्यादीवरण अंबड पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक रईस सय्यद मालक अमोल शिवनाथ जिगे दोघेही रा. मठ पिंपळगाव यांच्याविरुद्ध बी.एन.एस. २०२३ चे कलम ३०३(२), ३(५), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४८(७), ४८(८), खाण अधिनियम १९५२ चे कलम ३, ४ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ९, १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गोंदी पोलीस ठाणे हद्दीतील एका गुन्ह्यातील आरोपीस न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर वाहन सोडण्याचे आदेश देण्यात आले होते; मात्र महसूल विभागाचा दंड भरण्यात आलेला नव्हता. यामुळे दंडात्मक कार्यवाहीसाठी संबंधित ट्रॅक्टर जप्त करत तहसील कार्यालयात आणण्याची कारवाई मंडळ अधिकारी कृष्णा हेडके, तलाठी विश्वास ढवळे, कोतवाल मनोज उघडे पथकाने केली.
हे ट्रॅक्टर कुख्यात गुंड विलास शिंदे उर्फ वकिल्या यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले. वाहन जप्त करत असताना काही महिलांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला; मात्र गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, दिपक भोजने, शाकेर सिद्दीकी, प्रदिप हिवाळे,पथकाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून बंदोबस्त पुरवला ट्रॅक्टर सुरक्षितपणे तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.
तहसीलदार विजय चव्हाण यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “कोणत्याही परिस्थितीत अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक खपवून घेतली जाणार नाही. संबंधितांवर दंडात्मक तसेच फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई करण्यात येईल. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पोलीस ठाण्यांना पत्र देण्यात आले आहे. नागरिकांनी अवैध वाळू वाहतूक टाळावी; अन्यथा कोणतीही गय केली जाणार नाही.” या दोन्ही कारवाया यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी सुनील कारामपुरी, धनगर पिंपरी मंडळ अधिकारी, कृष्णा ऐडके, तलाठी स्वप्नील खरात, तलाठी विश्वास ढवळे, श्याम विभूते, विकास डोळसे, गाडेकर, कोतवाल मनोज उघडे, महसूल व पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.