Jalna rainfall shortage pudhari photo
जालना

Jalna rainfall shortage : सप्टेंबर अर्धा सरला, जिल्ह्यातील प्रकल्प, विहिरी कोरड्याच; टँकरचा भार वाढला!

खरीप पिके संकटात, वार्षिक सरासरीच्या केवळ ६१.४ टक्के पाऊस, २२ टँकर्सद्वारे ४२ हजार नागरिकांची भागतेय तहान

पुढारी वृत्तसेवा

जालना : पोळा आणि पाऊस होतोय भोळा, अशी ग्रामीण भागात म्हण आहे. पोळा सणापासून पाऊस कमी कमी होत जातो. गत दीड महिन्यापासून पाऊस रुसला असल्याने जिल्हाभरातील मोठे, लघु प्रकल्प, विहिरीतील पाणीपातळी झपाट्याने घटत चालली आहे. पुढे पाऊस येणार की नाही, याबाबतीतही शेतकऱ्यांत चिंतेचे ढग जमले आहे.

जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट गडद होत आहे. सध्या २२ टँकरद्वारे ४२ हजार नागरिकांची तहान भागवल्या जात असून, सप्टेंबर महिना अर्धा सरल्याने खरीप पिक बुडीत निघण्याची भिती शेतकऱ्यांतून व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान, पावसाळ्याचे तीन महिने उलटले असून, गत दीड महिन्यापासून दरमदार पाऊस पडला नसल्याने जिल्ह्यावरील भीषण पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे.

जिल्ह्यात १३ सप्टेंबर अखेर ४१८.८ मि.मी. म्हणजे वार्षिक सरासरीच्या (६०३.१० मि.मी.) केवळ ६९.४ टक्केच पाऊस पडला आहे. आजपर्यंतच्या अपेक्षित पावसाच्या तुलनेत हे प्रमाण ८०.१ टक्के इतके आहे. महिनाभरापासून पावसाने मारलेल्या दडीमुळे व एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट अधिक गढूळ बनत चालले आहे. सध्या जिल्ह्यातील १८ गावे आणि ४ वाड्यांमधील तब्बल ४२ हजार ७४३ नागरिकांची तहान २२ टँकरद्वारे भागवावी लागत आहे.

पावसातील प्रदीर्घ खंड आणि अपुऱ्या पावसामुळे जमिनीतील ओलावा वेगाने कमी झाला आहे. सध्या सोयाबीन, कापूस, तूर आणि मका ही खरीप पिके फुल व फळधारणेच्या अत्यंत निर्णायक टप्प्यावर आहेत. मात्र, पाऊस लांबल्याने पिकांना संरक्षणात्मक सिंचन देण्यासाठी शेतकऱ्यांना विहीर व बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे सिंचनाचा खर्च वाढला असून पिकांच्या उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने टँकर व विहीर अधिग्रहणाला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून २४ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

सध्या खरीप पिकाला वाचवण्याची धडपड शेतकरी करताना दिसून येत आहे. विहिरीत उपलब्ध पाण्यावर तुषार, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी देणे सुरू आहे. मात्र, कोरडवाहू शेतकऱ्यांना पावसाच्या रुसण्याचा मोठा आर्थिक फटका बसण्याची चिन्हे आहेत. पावसाअभावी खरीपाचे पिके सुकून चालली आहे. यामुळे शेतकरी हतबल दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT