Jalna Rain News : Rain returns in the district; Kharif crops got a boost
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात काही दिवस दडी मारलेल्या पावसाने मंगळवारपासून पुन्हा दमदार हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या मागील 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 20.6 मिमी पावसाची नोंद झाली असून, आठही तालुक्यांत पावसाने हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे मंठा तालुक्यातील तळणी मंडळात 77 मिमी पावसाची नोंद झाल्याने तेथे अतिवृष्टी झाली आहे.
जिल्ह्यात यंदाच्या पावसाने सुरुवातीला चांगली साथ दिल्यानंतर काही दिवस विश्रांती घेतली होती. त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मका आदी खरीप पिके पावसाअभावी संकटात सापडली होती. मात्र, मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
जालना जिल्ह्यात मागील 24 तासांत मंठा तालुक्यात सर्वाधिक 35.5 मिमी, त्यानंतर जालना 27.9 मिमी, भोकरदन 26.1 मिमी, बदनापूर 21.1 मिमी, जाफराबाद 18.8 मिमी, अंबड 15.1 मिमी, घनसावंगी 12.2 मिमी आणि परतूर 10.8 मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्याची सरासरी 20.6 मिमी इतकी राहिली.
१ जून ते २२ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी 260 मिमी पाऊस झाला असून, तो अपेक्षित पावसाच्या 103.7 टक्के आहे. मात्र, वार्षिक सरासरीच्या तुलनेत अद्याप केवळ 43.1 टक्के पाऊस झाल्याने आगामी काळातही सातत्यपूर्ण पावसाची गरज कायम आहे.
दरम्यान, पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस अत्यंत पोषक ठरणार असल्याचे कृषी क्षेत्रातून सांगण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात सर्वदूर पडलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. पिकांना आवश्यकतेनुसार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील पीक परिस्थिती सध्या तरी चांगली असल्याचे पहावयास मिळत आहे.
पातळीत वाढ नाही
जालना जिल्ह्यात अद्याप मोठे पाऊस पडले नसल्यामुळे रिमझिम पावसावर खरिपाची पिके तरारली असली तरी ७ मध्यम व ६० लघु तलावातील पाणी पातळी अद्यापही समाधानकारक नसल्यामुळे विहिरी व बोअरच्या पाणीपातळीत अद्याप वाढ झाली नसल्याचे चित्र आहे.
मंगळवार आठवडे बाजारात पावसामुळे व्यापाऱ्यांची धावपळ
पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे मंगळवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारात आलेल्या व्यापारी आणि शेतकऱ्यांची धावपळ उडाली. पिंपळगाव रेणुकाई येथील मंगळवारी भरणारा आठवडे बाजार परिसरात प्रसिद्ध आहे. येथे जवळपास 25 ते 30 गावांतील शेतकरी व व्यापारी खरेदी-विक्रीसाठी येतात. भाजीपाला, धान्य, कपडे, भांडी, शेतीसाहित्य अशा छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांची बाजारात दुकाने असतात. मंगळवारी बाजार भरल्यानंतर अचानक आलेल्या पावसामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजीपाला आणि कपड्यांच्या व्यापाऱ्यांनी प्लास्टिक आणि ताडपत्री टाकून माल झाकण्याची धावपळ केली. काही व्यापाऱ्यांचा माल भिजल्याने नुकसानही झाले. शेतकरीही माल विकण्यासाठी आले होते. मात्र पावसामुळे खरेदीदारांची संख्या कमी झाली. त्यामुळे बाजारपेठेला काहीसा ओस पडल्याचे चित्र होते.
दिलासा आणि अडचण एकाचवेळी
गेल्या काही दिवसांपासून पावसाअभावी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना हा पाऊस दिलासादायक असला तरी आठवडे बाजारात मात्र त्याचा फटका बसला दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने बाजार पुन्हा हळूहळू सुरळीत होऊ लागला, मात्र सकाळची झालेली धावपळ व्यापाऱ्यांच्या चांगलीच लक्षात राहिली.