आन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वासह परिसरात सोमवारी (दि.२२) सकाळी आठ वाजेच्या सुमारास जोरदार परतीचा पाऊस झाला. यामुळे जुई नदीला मोठा पूर आला आहे. या पुरामुळे नदी काठच्या शेतात पूराचे पाणी शिरल्याने काही शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहेत.
खरीप हंगामातील सुरुवातीला कमी-अधिक पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात परतीच्या पावसाने सुद्धा पाणी आणणार असल्याचे दिसून येत आहेत. दरम्यान दोन दिवसांत परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. मान्सून परतीच्या काळात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाचा अंदाज असल्याने परतीचा पाऊस राज्यात धुमाकूळ घालण्याची शक्यता हवामान अंदाजानुसार वर्तविण्यात आली आहे.
काही भागात सोयाबीन काढणे तसेच अनेक काही कडधान्य पीक काढण्याचे कामे सुरू होणार असून नुकतेच परतीच्या जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला माल वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.