जालनाः स्वदेशी ड्रोनद्वारे कृत्रिम पावसाची चाचणी घेताना उपस्थित मान्यवर.  pudhari photo
जालना

Jalna Cloud Seeding Trial : दुष्काळात स्वदेशी ड्रोनद्वारे कृत्रिम पावसाची चाचणी

‘प्रिम एरोस्पेस’चा उपक्रम, ४०० मीटर उंचीवर क्षारआधारित उच्च-सघनतेचे सीडिंग द्रव्य फवारले

पुढारी वृत्तसेवा

जालना : दुष्काळ आणि पाणीटंचाईवर तांत्रिक उपाय शोधण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत प्रिम एरोस्पेस कंपनीने स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ढगांमध्ये क्लाउड सीडिंग (कृत्रिम पावसासाठी रासायनिक प्रक्रिया) करण्याची चाचणी यशस्वीपणे पार पाडली. मानवरहित हवाई प्रणालींचा वापर हवामान सुधारणा आणि पर्जन्यवृद्धीसाठी कसा करता येईल, याची क्षमता या चाचणीतून दिसून आली.

दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी जालना शहराजवळील इस्लामवाडी येथील टेकडीवरून करण्यात आलेल्या या प्रात्यक्षिक चाचणीच्यावेळी प्रिम एरोस्पेसचे प्रद्युम्न मानधानी, संजीवनी हॉस्पिटलचे संचालक डॉ. बळीराम बागल आदींची उपस्थिती होती.

अपुऱ्या पावसामुळे आणि घटत्या जलसाठ्यांमुळे अनेक भागांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग संरक्षण, शेती आणि व्यावसायिक क्षेत्रांपलीकडे कसा करता येईल, हे तपासण्यासाठी कंपनीने हा पुढाकार घेतला आहे. चाचणीदरम्यान प्रिम एरोस्पेसच्या विशेष ड्रोनने सुमारे ४०० मीटर उंचीवर क्षारआधारित (मिठावर आधारित) उच्च-सघनतेचे सीडिंग द्रव्य वातावरणात फवारले.

अनुकूल वातावरणीय परिस्थितीत हे कण सोडून ढगांतील सूक्ष्म-भौतिक प्रक्रियांना चालना देणे, हा या प्रयोगाचा उद्देश होता. क्लाउड सीडिंगमागील विज्ञान क्लाउड सीडिंगमध्ये योग्य ढगांमध्ये विशिष्ट कण सोडले जातात. त्यामुळे पाण्याचे थेंब किंवा बर्फाचे स्फटिक तयार होण्याच्या आणि वाढण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.

ढगांची रचना, तापमान, आर्द्रता आणि वातावरणीय स्थिती यांनुसार या प्रक्रियेमुळे पर्जन्याला चालना मिळून पावसाची शक्यता वाढू शकते. ड्रोन तंत्रज्ञान आणि हवाई फवारणी प्रणाली एकत्र करून क्लाउड सीडिंग मोहिमा अधिक लवचिक आणि लक्ष्यित पद्धतीने राबविता येतील का, याचा अभ्यास प्रिम एरोस्पेस करत आहे.

दुष्काळी परिस्थितीवर मात करणे, शेतकऱ्यांना आधार देणे आणि पाणीटंचाईचा सामना करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. योग्य परिस्थितीत शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाल्यास, पर्जन्यवृद्धी हे व्यापक जलव्यवस्थापन आणि दुष्काळनिवारण प्रयत्नांतील एक अतिरिक्त साधन ठरू शकते, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या प्रयोगामुळे कुतूहल निर्माण होत आहे.

येत्या शास्त्रीय मूल्यमापन आणि चाचण्या घेणार- स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञानाचे उपयोग विस्तारण्याचे काम प्रिम एरोस्पेस सातत्याने करत आहे. प्रगत अभियांत्रिकी आणि नवोन्मेष पारंपरिक विमानवाहतूक क्षेत्राच्या पलीकडील समस्या सोडविण्यासाठीही उपयोगी ठरू शकतात, हे यातून दिसते. ड्रोनआधारित क्लाउड सीडिंग तंत्रज्ञानाची परिणामकारकता आणि व्यापक वापराची शक्यता तपासण्यासाठी कंपनी पुढील काळात आणखी शास्त्रीय मूल्यमापन आणि चाचण्या घेणार आहे.
प्रद्युम्न मानधानी, प्रिम एरोस्पेस.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT