भोकरदन ः भोकरदन ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या गर्भवती महिलेच्या बाळाच्या हृदयाचे ठोके तपासणी करताना महिलेच्या पोटाला जेल लावण्याऐवजी नर्सकडून तीव्र फिनाईल लावण्यात आल्याने महिलेच्या पोटाला भाजल्याने जखमा झाल्याची घटना घडली. भोकरदन ग्रामीण रुग्णालयाच्या गलथान कारभाराबाबत रुग्णातून संताप व्यक्त होत आहे.
भोकरदन तालुक्यातील खापरखेडा येथील शीला संदीप भालेराव (25)या गर्भवती महिलेस भोकरदन येथील रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी महिलेच्या बाळाच्या हृदयाचे ठोके तपासणी करताना महिलेच्या पोटाला जेल लावण्याऐवजी नर्सकडून तीव्र फिनाईल लावण्यात आल्याने महिलेच्या पोटाला भाजल्याने जखमा झाल्या.घटनेनंतर अवघ्या तासानंतर शुक्रवारी सकाळी आठ वाजता या महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला.
महिलेचे बाळ सुखरूप आहे. मात्र महिलेच्या पोटासह खालील भाग भाजल्याने महिलेवर उपचार करण्यात येत आहेत. ग्रामीण रुग्णालयातील ब्रदरने प्रसूतीगृहात औषधाच्या ट्रेमध्ये जेल सोल्युशनऐवजी तीव्र स्वरूपाचे फिनाईल ठेवल्याने चुकून नर्सकडून ते लागले असल्याची माहिती रुग्णालयात प्रशासनाकडून नातेवाईकांना देण्यात आली. भोकरदन ग्रामीण रुग्णालयातील या गलथान कारभारानंतर वैद्यकीय अधिकार्यांनी कर्मचार्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या. आवश्यकता आहे.
या प्रकरणांमध्ये स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील प्रशासनाला घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल.राजेंद्र पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक जालना.