जालनाः उसाच्या फडात महिलेची प्रसूती झाली आहे. महिला आणि मुलाचे आरोग्य ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले.  pudhari photo
जालना

Jalna News : ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्याची होतेय ‘परवड’ !

पारडगाव परिसरात उसाच्या फडातच महिलेची प्रसूती, कागदावर योजना; आरोग्य विभाग आणि प्रशासकीय अनास्थेचा ऊसतोड कामगारांना फटका

पुढारी वृत्तसेवा

जालना : पारडगाव (ता. घनसावंगी) शासनाकडून गर्भवती महिलांच्या सुरक्षित प्रसूतीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्चून विविध योजना कागदावर राबवल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात मात्र ऊसतोड कामगारांच्या नशिबी 'वनवास' कायम असल्याचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. पारडगाव (ता. घनसावंगी) परिसरात ऊसतोडीसाठी आलेल्या एका गर्भवती महिलेची कोणतीही आरोग्य सुविधा न मिळाल्यामुळे रविवार , दि. २५ रोजी थेट ऊसाच्या फडातच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे ऊसतोड कामगार महिलांच्या सुरक्षित प्रसूतीचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, सोमवार, दि. २६ रोजी आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी जाऊन त्यांनी त्या महिलेची आणि चिमुकल्याच्या आरोग्याची तपासणी केली. या कुटुंबातील गर्भवती महिलेला अचानक तीव्र प्रसूतीवेदना सुरू झाल्या. मात्र, स्थलांतरित वस्तीवर तातडीने रुग्णवाहिका किंवा कोणतेही वाहन उपलब्ध न झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहचता आले नाही.

परिणामी, या महिलेची उसाच्या फडातच प्रसूती झाली. प्रसूतीनंतर काही तासांनी नातेवाईकांनी वाहनाची जुळवाजुळव करून महिलेला खासगी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने माता व बाळ सुरक्षित असले, तरी या घटनेने आरोग्य यंत्रणेच्या नियोजनाचे पितळ उघडे पाडले आहे.

माता-बालकांच्या सुरक्षेची आणि संस्थात्मक प्रसुतीसाठी प्रयत्न करणाऱ्या आरोग्य विभागाने परजिल्ह्यातून आलेल्या गरोदर ऊसतोड कामगार महिलांच्या नोंदीबाबत आग्रही असणे गरजेचे आहे.

स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या तात्पुरत्या वस्त्यांवर नियमित वैद्यकीय तपासणी पथके पाठवणे, २४ तास रुग्णवाहिका उपलब्ध ठेवणे आणि मुलांसाठी हंगामी शाळा किंवा वसतिगृहांची सोय करणे अत्यंत गरजेचे आहे. आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि स्थानिक प्रशासनाने कागदी घोडे नाचवणे बंद करून प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी करावी आणि या कुटुंबांना मूलभूत हक्क मिळवून द्यावेत, अशी तीव्र मागणी परिसरातून होत आहे.

आरोग्य विभागाची 'नजरचूक' की घोर दुर्लक्ष?

एकीकडे शासकीय नियमानुसार स्थलांतरित वस्त्यांवर 'आशा' स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि एएनएम (ANM) यांच्यामार्फत गर्भवती महिलांची नोंदणी व नियमित तपासणी होणे बंधनकारक आहे. मात्र, जळगाववरून आलेल्या या कुटुंबाची साधी नोंदणीही आरोग्य विभागाकडे नव्हती का? प्रसूतीची संभाव्य तारीख आणि धोके लक्षात घेऊन आपत्कालीन रुग्णवाहिकेचे नियोजन का करण्यात आले नाही? पर जिल्ह्यातून आलेल्या अनेक ऊसतोड महिला कामगारांची आरोग्य विभाग, त्यांच्या मुलांची शिक्षण विभाग किंवा संबंधित ग्रामपंचायतीकडे नोंदणी आहे की नाही, हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. महिलांच्या सुरक्षित बाळंतपणासाठी अनेक शासकीय योजना राबविल्या जातात. परंतु, या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी संबंधित लाईन डिपार्टमेंट किती सजग आहे, हे या प्रकारातून पुढे आले आहे.

पारडगाव शिवारातील उसाच्या फडात एका महिलेची प्रसूती झाली असल्याची माहिती आताच मिळाली आहे. याची चौकशी करण्यासाठी घनसावंगी येथील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना त्वरित पारडगाव शिवारात घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या संदर्भात अधिक चौकशी करायला सांगितली आहे. त्यानंतर जे काही आहे ते सांगण्यात येईल.
डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. जालना.
माझी सून गर्भवती होती. शेतात राहत असल्याने तातडीने दवाखान्यात जाण्यासाठी वाहन नव्हते, त्यामुळे फडातच प्रसूती झाली. शासनाने आमच्यासारख्या ऊसतोड कामगारांच्या हालअपेष्टांकडे लक्ष देऊन आरोग्य सोयी पुरवाव्यात.
श्रीमती आक्काबाई पवार (ऊसतोड कामगार महिला, पारडगाव)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT