जालनाः खरपुडी शिवारात अवैध वाळूसाठा जप्त करण्यात आला. याप्रसंगी उपस्थिीत पोलिस अधिकारी.  pudhari photo
जालना

Illegal Sand Mining : खरपुडी शिवारात ३५० ब्रास अवैध वाळू साठा जप्त!

वाळू तस्करीचे धाबे दणाणले

पुढारी वृत्तसेवा

जालना: जालना तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खरपुडी शिवारात अवैध वाळू साठवणुकीविरुद्ध पोलिसांनी एक मोठी धडक कारवाई केली आहे. अप्पर पोलिस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली टाकण्यात आलेल्या छाप्यात सुमारे ३०० ते ३५० ब्रास बेकायदेशीर वाळूचा साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील वाळू माफिया आणि अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि बेकायदेशीर साठवणुकीविरोधात पोलिस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेंतर्गत जालना तालुक्यातील खरपुडी शिवार येथे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररीत्या वाळूचा साठा करून ठेवण्यात आल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने या ठिकाणी अचानक धाड टाकली. या कारवाईदरम्यान पोलिसांना तब्बल ३०० ते ३५० ब्रास वाळूचा अवाढव्य साठा आढळून आला, जो पोलिसांनी तत्काळ जप्त केला.

या धडक कारवाईनंतर आता महसूल विभागाच्या समन्वयाने जप्त केलेल्या वाळू साठ्याचे रीतसर मोजमाप केले जात असून, त्याची निश्चित किंमत ठरवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या बेकायदेशीर साठवणुकीमागे असणाऱ्या संबंधित घटकांवर नियमानुसार कडक कायदेशीर कारवाई केली जात आहे.

ही धडक छापा कारवाई सपोनि योगेश खटकळ, पोलिस अंमलदार गायकवाड तसेच स्थानिक गुन्हे शाखा व तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

कारवाया आणखी तीव्र करणार- जिल्ह्यात अवैध वाळू उपसा, वाहतूक आणि साठवणुकीविरोधात पोलीस प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायांवर यापुढेही सातत्याने कारवाया सुरू राहणार असून, त्या अधिक तीव्र केल्या जातील. कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
विक्रम साळी, अपर पोलिस अधीक्षक, जालना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT