सुखापुरी : जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील पंचायत समिती कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या शासकीय बांधकामादरम्यान जुना कॉलम अचानक कोसळून त्याखाली दबून रुई (ता. अंबड) येथील ३० वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला. आनंद अशोक भरपूर असे मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी (दि. ४) सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
अंबड तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांवर रोजगारासाठी स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. हाताला मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक तरुणांची धडपड सुरू आहे. त्याच परिस्थितीत रुई येथील काही तरुण गेल्या सुमारे १५ दिवसांपासून घनसावंगी येथील पंचायत समिती कार्यालयाच्या शासकीय बांधकामावर मजुरीसाठी जात होते. मात्र, कामाच्या ठिकाणीच आनंद भरपूर यांच्यावर काळाने घाला घातला.
मिळालेल्या माहितीनुसार, पंचायत समिती कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर बांधकामाचे काम सुरू असताना जुना कॉलम अचानक कोसळला. यावेळी आनंद यांच्या अंगावर कॉलम पडल्याने ते त्याखाली दबले. दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सहकारी कामगार आणि उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मात्र, गंभीर दुखापत झाल्याने आनंद यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
पंचायत समितीसारख्या शासकीय कार्यालयाच्या इमारतीवर बांधकाम सुरू असताना कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती का, असा प्रश्न या दुर्घटनेनंतर उपस्थित झाला आहे. जुना कॉलम पाडताना किंवा त्यावर काम सुरू करण्यापूर्वी त्याची तांत्रिक तपासणी करण्यात आली होती का? कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली होती का? या सर्व बाबींची चौकशी होणे गरजेचे आहे.
दरम्यान, दुर्घटनेनंतर काही तास उलटूनही घटनास्थळी संबंधित शासकीय अधिकारी- कर्मचारी उपस्थित नसल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी केला. आनंद यांचे नातेवाईक तसेच रुई येथील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त करण्यात येत होता.
वृत्त लिहीपर्यंत घटनेचा पंचनामा झालेला नसल्याची तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची माहिती मिळाली. कामगाराच्या मृत्यूला नेमकी कोणाची जबाबदारी आहे, बांधकामाच्या सुरक्षिततेची तपासणी करण्यात आली होती का आणि संबंधित कंत्राटदार अथवा जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दुष्काळामुळे रोजगाराच्या शोधात घरापासून दूर जाऊन काम करणाऱ्या तरुणाचा शासकीय बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच आनंद भरपूर यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. आनंद यांच्या मृत्यूने रुई गावावर शोककळा पसरली आहे.