विलास जाधव
जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड गावाजवळील खारुळ तळ्यात एक युवक बेपत्ता झाल्याची घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली. रामनाथ फकीरराव भोजने (वय अंदाजे 39 वर्षे, रा. जामखेड) असे बेपत्ता युवकाचे नाव आहे. ते शुक्रवारी (दि. 9 जानेवारी) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घराबाहेर पडले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने नातेवाइकांनी त्यांचा शोध सुरू केला.
दरम्यान, शेतातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना खारुळ तळ्याच्या काठावर एक दुचाकी उभी असल्याचे दिसून आले. ही दुचाकी रामनाथ भोजने यांची असल्याचे निष्पन्न झाले. शनिवारी (दि. 10 जानेवारी) सकाळी मोबाईल ट्रॅकिंगद्वारे तपास केला असता तळ्याच्या काठावरच त्यांचा मोबाईल, कपडे व चप्पल आढळून आले. त्यामुळे रामनाथ भोजने हे तळ्यात बुडाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी तातडीने अंबड पोलिसांना कळवले. अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तळ्यात बोटीच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. सकाळी सुमारे दहा वाजता अंबड येथील अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर जालना येथील अग्निशामक दलाची अतिरिक्त मदतही रविवारी (दि. १० जानेवारी) घटनास्थळी पोहोचली.
या शोध मोहिमेत अंबड पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. छोटूराम ठुबे, अमोल गुरले, रविंद्र चव्हाण यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी सक्रिय सहभाग घेत आहेत. उशिरापर्यंत तळ्यात शोध कार्य सुरू होते. मात्र अद्यापही रामनाथ भोजने यांचा थांगपत्ता लागलेला नाही. या घटनेमुळे भोजने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात चिंतेचे वातावरण आहे. घटनेचा पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत.