जालना

Jalna News : दुष्काळाच्या संकटात तरुण शेतकऱ्याने शेततळ्यात संपविले जीवन, दहिगाव (खुर्द) येथील घटना

आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलल्याची नातेवाईकांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

शरद मुळे

सुखापुरी : अंबड तालुक्यातील दहिगाव (खुर्द) येथे दुष्काळी परिस्थिती आणि आर्थिक विवंचनेने त्रस्त असलेल्या एका तरुण शेतकऱ्याने शेततळ्यात उडी घेऊन जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. ७) सायंकाळी उघडकीस आली. गणेश अंशीराम लहामगे (वय ३२) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे दहिगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दुष्काळाच्या झळा आणि शेतीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी कुटुंबांसमोरील संकट पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश लहामगे हे शेती व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. यंदाच्या हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पिकांसाठी केलेला खर्च, अपेक्षित उत्पन्नाची अनिश्चितता आणि वाढती आर्थिक चणचण यामुळे ते प्रचंड विवंचनेत असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

बुधवारी सायंकाळच्या सुमारास गणेश लहामगे यांचा मृतदेह शेतातील शेततळ्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.

उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया पार पडली. या प्रकरणी पोलिसांकडून पंचनामा व पुढील कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यात येत आहेत. या टोकाच्या पावलाचे नेमके कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार असले, तरी दुष्काळी परिस्थिती आणि आर्थिक विवंचनेतूनच गणेश यांनी जीवन संपविल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

गणेश लहामगे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि आई-वडील असा परिवार आहे. घरातील कर्त्या तरुणाने अशा प्रकारे अकाली जीवन संपविल्याने लहामगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच दहिगाव परिसरावर शोककळा पसरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT