जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरातील एमआयडीसी परिसरात चोरीछुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीवर चंदनझिरा पोलिसांनी धडक कारवाई करत सात ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत सात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून ३० हजार १०० किमतीचा देशी, विदेशी व गावठी हातभट्टी दारूचा साठा जप्त करण्यात आला.
नूतन पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत ४ ऑगस्ट रोजी एमआयडीसी परिसरातील विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत सुरेश दादू गवारे, रतन बाबुराव साळवे, सोपान रमेश साळुंके, वैभव पांडुरंग उंडे, राज टेकचंदूर सुनार, धनंजय ज्ञानकीराम देठे तसेच एका महिला आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून देशी, विदेशी आणि गावठी हातभट्टी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून सर्वांविरुद्ध चंदनझिरा पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक तेघबीर सिंग संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी व उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांच्या नेतृत्वाखालील पोउनि स्कॉट, मनसुब वेताळ, राजेंद्र ठाकूर, कृष्णा तंगे, शिवाजी जमधडे, सुभाष पवार, अभिजित वायकोस, शरद पवार, सागर खैरे, रेश्मा गुरूम, शीला लोखंडे आदीं पथकाने केली.