आन्वा (जालना) : भोकरदन तालुक्यातील आन्वासह परिसरात गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरणामुळे झालेली तापमान वाढ अशा संक्रामक वातावरणामुळे सध्या कफजन्य आजाराचा प्रकोप वाढला आहे. सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसत असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना या वातावरणामुळे जास्त त्रास सहन करावा लागत आहे.
मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. बदलत्या वातावरणाचा आरोग्याला फटका बसत आहे. सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. घरोघरी सर्दी, खोकला सारख्या आजाराचे रुग्ण दिसत आहेत. ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णाची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.
सद्य:स्थितीत पावसाचे दिवस असतानाच अधूनमधून दिवसा उष्णतेत वाढ होत आहे. पावसाळी वातावरण आणि रखरखते ऊन यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. अशावेळी पालकांनी लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. लहान बालकांना ताप, सर्दी,खोकला असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व औषधे घेऊन उपचार करावा. वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे उपचार करून घेण्यासाठी खासगी व शासकीय दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे पालकांनी स्वत:बरोबर लहान मुलांची तसेच वृद्धांची काळजी घ्यावी. बाजारहाट करतेवेळेस गर्दीचे ठिकाण टाळावे. ताप आल्यास याबाबत घरचा कोणताही उपाय करू नये. लगेच जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना दाखवावे. डॉक्टरांनी दिलेली औषधी वेळेवर घ्यावी. ताप उतरेपर्यंत रोजच्या रोज पाणी उकळून प्यावे. कुटुंबप्रमुखांनी लहान मुले तसेच वृद्धांची काळजी घ्यावी. घराचा परिसर स्वच्छ ठेवावा.
मागील दहा दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने खोकला, सर्दी, ताप, अंग दुखणे, डोके दुखणे, पोट दुखणे, आदी आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बदललेल्या वातावरणामुळे ही साथ पसरत आहे. पालकांनी लहान मुलांची तसेच वृद्ध मंडळींची खबरदारी घेणे आवश्यक आहे. ताप किंवा सर्दी हा आजार अंगावर काढू नये. लगेच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी.डॉ. मोबीनखान पठाण, आन्वा प्राथमिक आरोग्य केंद्र