जालना

Jalana illegal sand mining | भुतेगाव शिवारात अवैध वाळू माफियांवर पोलिसांचा दणका

३ जेसीबी, ८ हायवा टिपरसह ३.४५ कोटींचा मुद्देमाल जप्त; घनसावंगी पोलिसांची धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

घनसावंगी : तालुक्यातील भुतेगाव शिवारातील दुधना नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर घनसावंगी पोलिसांनी गुरुवारी पहाटे मोठी धडक कारवाई करत वाळू माफियांचे कंबरडे मोडले. या कारवाईत ३ जेसीबी मशीन, ८ हायवा टिपर आणि १२ ब्रास वाळूसह तब्बल ३ कोटी ४५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक केतन राठोड यांना ४ जून रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास भुतेगाव शिवारातील दुधना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर त्यांनी तातडीने दोन स्वतंत्र पथके तयार करून नदीपात्राकडे रवाना केले.

पोलीस पथकाने घटनास्थळी छापा टाकला असता, तीन जेसीबी मशीनच्या साहाय्याने आठ हायवा टिपरमध्ये वाळू भरली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांचा अचानक छापा पडताच परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ सर्व वाहने ताब्यात घेत चालकांची चौकशी केली असता त्यांच्याकडे वाळू उत्खनन व वाहतुकीसाठी आवश्यक असलेली कोणतीही वैध परवानगी अथवा कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे उघड झाले.

या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या ३ जेसीबी मशीन, ८ हायवा टिपर आणि १२ ब्रास वाळूची एकूण किंमत ३ कोटी ४५ लाख ५५ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त केलेली सर्व वाहने पुढील कायदेशीर कारवाईसाठी घनसावंगी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि अंबड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली घनसावंगी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक केतन राठोड व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT