Jalna News: Extensive Damage to Banana, Sugarcane, and Mango Crops, Along with Solar Pumps
आष्टी, पुढारी वृत्तसेवा : परतूर तालुक्यातील आष्टी व कोकाटे हादगाव मंडळात शनिवारी (दि. २४) सायंकाळच्या सुमारास झालेल्या भीषण वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठे नुकसान केले. आष्टी गावातील मोढा भागासह परतवाडी, पांडेपोखरी, वाहेगाव, सातारा, ढोणवाडी, आसनगाव, कोकाटे हादगाव, लोणी, पळसी, फुलवाडी, रायगव्हाण आदी गावांमध्ये वादळाने अक्षरशः थैमान घातले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे केळी, ऊस, आंबा तसेच रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोलार पंप व सोलार पॅनल उखडून पडले असून काही ठिकाणी ते वाऱ्यामुळे दूरपर्यंत उडून गेले. शेडनेट, पॉलिहाऊस तसेच जनावरांसाठी उभारण्यात आलेले शेडही वादळात उद्ध्वस्त झाले. द्राक्ष व केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले असून उभा असलेला ऊस जमीनदोस्त झाला आहे. आंब्याच्या बागांनाही या वादळाचा मोठा फटका बसला.
वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने महावितरणच्या वीजतारा तुटल्या होत्या. त्यामुळे आष्टी व परिसरातील विजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. मात्र, महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हेल्परच्या पथकासह तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेत विजपुरवठा सुरळीत केला.
दरम्यान, फुलवाडी येथील अर्जुन गणेश घनवट यांच्या शेतात वीज कोसळून एक बैल जागीच ठार झाला. तसेच झाडाखाली आसरा घेतलेल्या मिनाबाई हिराजी शेळके (४२) व त्यांची मुलगी पुनम हिराजी शेळके (१५) यांच्या अंगावर लिंबाच्या झाडाची मोठी फांदी कोसळल्याने दोघी मायलेकी गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत