Jalna News : साष्टपिंपळगाव, गांधारी वाळू घाटांवर ईटीएस मोजणी पूर्ण file photo
जालना

Jalna News : साष्टपिंपळगाव, गांधारी वाळू घाटांवर ईटीएस मोजणी पूर्ण

अंबड प्रशासनाचा गोदावरी पात्रात धडक सर्जिकल स्ट्राईक

पुढारी वृत्तसेवा

Jalna News: ETS Measurement Completed at Sashtpimpalgaon and Gandhari Sand Ghats

अंबड, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपशाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गोदापात्रात बुधवार, दि. २० रोजी अंबड महसूल विभाग आणि भूमी अभिलेख विभागाने अत्यंत धाडसी आणि गोपनीय सर्जिकल स्ट्राइक करून ईटीएस मोजणी पूर्ण केली.

दरम्यान, उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी आणि तहसीलदार विजय चव्हाण यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली ५० ते ६० अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्याने दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत वाळू घाटांमधील बेकायदेशीर खड्ड्यांची मोजणी पूर्ण केली. या कारवाईत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुका प्रशासनालाही पाचारण करण्यात आले होते.

दरम्यान सदर कारवाईची व्याप्ती आणि आंतर जिल्हा सीमा लक्षात घेऊन अंबडची उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी बीडच्या उपयोगी दंडाधिकाऱ्यांना या मोहिमेत समाविष्ट होण्यासाठी विनंती केली होती मात्र काही अपरिहार्य अडचणीमुळे बीडचे उपविभागीय अधिकारी स्वतः उपस्थित राहू शकले नसल्याने त्यांनी गेवराईचे तहसीलदार आणि संबंधित तलाठी या संयुक्त कार्यासाठी घटनास्थळी हजर होते.

दरम्यान बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सावरगाव येथील टेंडर धारकांनी जालना जिल्ह्याची सीमा ओलांडून अंबड तालुक्यातील गंधारी घाटाच्या हद्दीत घुसखोरी सुरू करून बीड हद्दीतून बेकायदेशीर रस्ता करून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी आणि वाहतूक सुरू केल्याचे बीड जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

याशिवाय मौजे डोमलगाव घाट क्र. १, माळस पिंपळगाव, साष्ट पिंपळगाव, डोंबलगाव अशा अनेक ठिकाणी वाळूमाफियांनी रात्रंदिवस धुमाकूळ घालून अधिकारी व कर्मचाऱ्यांना धमक्या देऊन वाळू चोरी केली आहे. त्याचे व्हिडिओ पुरावे सुद्धा बीड प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन यापूर्वी दोन ते तीन वेळा स्मरणपत्रसुद्धा देण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार विजय चव्हाण यांनी यावेळी दिली.

दरम्यान सदर धडक मोहीम ही जिल्हाधिकारी अशीमा मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अंबडचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार विजय चव्हाण, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक अशोक कोन्ते, मिटकरी मुंडे नायब तहसीलदार एकनाथ भोजने मंडळाधिकारी कल्याण माने, कृष्णा एडके, तलाठी सुमित उंबरहांडे, गणेश खरात, लोणीकर, लव्हाळे कोतवाल, स्थानिक पोलिस पाटील आणि राजू वैद्य या पथकाने सदरची कारवाई पूर्ण केली.

शासनाचा महसूल बुडवून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या वाळू तस्करांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या प्रत्येकाचा बंदोबस्त केला जाईल. बीड आणि जालना दोन्ही जिल्ह्यांच्या सीमांवर आता २४ तास पाळत ठेवून कडक दंडात्मक कारवाई केली जात आहे.
-विजय चव्हाण, तहसीलदार अंबड

अशी आखली गोपनीय मोहीम

वाळूमाफियांना कारवाईची भनक लागू नये आणि प्रशासकीय हालचालींचे लोकेशन लीक होऊ नये म्हणून सर्व ५० ते ६० अधिकारी-कर्मचारी अत्यंत गोपनीयरीत्या अंबड येथील ए.पी.एम.सी. आवारात जमा झाले. तेथून खाजगी वाहनांद्वारे वेगवेगळ्या दिशांनी मार्गक्रमण करत साष्टपिंपळगाव घाट क्रमांक १ व २ ला चारही बाजूंनी वेढा घालण्यात आला. अचानक झालेल्या या छाप्यामुळे तस्करांची पळापळ झाली. घटनास्थळी भूमी अभिलेख विभागाच्या तीन अद्ययावत पथकांद्वारे ईटीएस मोजणी करून बेकायदेशीर उपशाचे मोजमाप करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT