शेतकरी डोळे लावून बसला आभाळाकडे 
जालना

Jalna News | विहीरींनी गाठला तळ बोअरवेलमध्येही ठणठणाट : मिरची ‘सलाईन’वर; पाण्याअभावी भोकरदन तालुक्यातील शेतकरी संकटात!

धोंड्या धोंड्या पाणी दे, साय माय पिकू दे ! म्हणत शेतकरी डोळे लावून बसला आभाळाकडे, पाण्याअभावी पिके माजू लागली शेवटची घटका!

पुढारी वृत्तसेवा

सागर देशमुख

जालना : "ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा" ही बालपणीची कविता आज प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या वेदना व्यक्त करणारी हाक ठरत आहे. भोकरदन तालुक्यातील पारध, पिंपळगाव रेणुकाई , वालसावंगी ,धावडा ,अनवा व परिसरात मोठ्या प्रमाणावर झालेली मिरची आणि गोबीची लागवड सध्या पाण्याअभावी अक्षरशः मृत्यूशी झुंज देत आहे. जून महिना सुरू होऊन अकरा दिवस उलटले तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे.

परिसरातील अनेक विहिरींचा तळ गाठला असून बोअरवेलही ठणठण कोरड्या पडल्या आहेत. परिणामी मिरची पिकाला आवश्यक तेवढे पाणी देणे अशक्य बनले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारी केवळ १५ ते २० मिनिटेच सुरू राहतात. त्यामुळे तीन ते चार एकरांवर मिरची लागवड केलेल्या शेतकऱ्यांसमोर एक एकर पीक जिवंत ठेवण्यासाठी उर्वरित दोन-तीन एकर पीक डोळ्यासमोर सुकू देण्याची वेळ आली आहे.

शेतकरी सांगतात की, शेजारच्या विहिरीत पाणी असल्यास दोन ते चार हजार रुपये देण्याची तयारी असतानाही कोणी पाणी देण्यास तयार नाही. कारण प्रत्येकाचीच विहीर दोन-तीन तासांपेक्षा जास्त चालत नसल्याने पाण्याची टंचाई सर्वांनाच भेडसावत आहे.

या भागात मिरचीबरोबरच गोबीची लागवडही मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती. मात्र गोबी पिकाला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. विहिरीत पाणीच नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी हतबल होऊन उभ्या गोबी पिकावर रोटावेटर फिरवला. लाखो रुपयांचे उत्पादन देणारे पीक स्वतःच्या डोळ्यांसमोर नष्ट करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

"पाणी असते तर एका एकरातून दोन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असते. मात्र आता संपूर्ण गुंतवणूक वाया जाण्याची भीती आहे," अशी भावना अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत. मृग नक्षत्र सुरू झाले असले तरी अपेक्षित पाऊस अद्याप झालेला नाही. शेतकऱ्यांचे डोळे सतत आभाळाकडे लागले आहेत. आभाळात ढगांऐवजी जणू चांदण्याच फिरत असल्याचे चित्र असून उन्हाळ्याची तीव्रता अजूनही कायम आहे. येत्या दोन-चार दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही तर लाखो रुपयांच्या मिरची व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या या शेतकऱ्यांना आता फक्त आभाळाच्या कृपेचीच आस लागली आहे. अन्यथा कर्ज, वाढलेला उत्पादन खर्च आणि पाण्याची तीव्र टंचाई यामुळे अनेक कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

"धोंड्या धोंड्या पाणी दे, साय माय पिकू दे" म्हणत पावसाला साकडे घालणाऱ्या पिढ्या आता इतिहासजमा झाल्या असल्या, तरी भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्त हाक आजही तशीच आहे. मिरची आणि भाजीपाला पिके वाचवण्यासाठी शेतकरी आभाळाकडे आशेने पाहत आहेत. पुढील काही दिवसांत पाऊस झाला नाही तर लाखो रुपयांचे नुकसान अटळ असून, शेतकऱ्यांच्या ओठांवर पुन्हा एकदा तीच हाक उमटू लागली आहे – "धोंड्या धोंड्या पाणी दे...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT