जालना : जालना शहर महापालिका झाल्यानंतर प्रथमच होत असलेल्या प्रभागांच्या निवडणुकीचे आरक्षण मंगळवारी जाहीर झाले. या आरक्षणात ६५ सदस्यांपैकी ३३ महिला सदस्य रा-हणार आहेत. एका प्रभागातून चार ते पाच जण निवडून जाणार असल्याने आरक्षणात दिग्गजांना धक्का लागला नसल्याचे चित्र आहे.
जालना महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी मंगळवारी प्रभागनिहाय आरक्षण सोडत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रशासकीय आयुक्त आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. एक एक प्रभागाचे आरक्षण जाहीर करण्यात येत असताना इच्छुकांच्या चेहऱ्यावर उत्सुकता दिसून आली. महापालिकेत ३३ महिला निवडून जाणार असल्याने महापालिकेत महिलाराज येणार असल्याचे दिसत आहे. यापूर्वी जालना नगरपालिकेतील भाजपाचे भास्करराव दानवे, राजेश राऊत, महावीर ढक्का, संध्याताई देठे, शिवसेना शिंदे पक्षाचे विष्णू पाचफुले यांच्यासह दिग्गजांना आरक्षणात धक्का बसला नसल्याने मात्तबरांमधे फिलगुडचे वातावरण आहे. आरक्षण जाहीर झाल्याने आता इच्छुक उमेदवार निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीस प्रारंभ करणार आहे. १६ प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक १ मधे पाच सद्स्य निवडून जाणार असून इतर प्रभागातून प्रत्येकी चार सदस्य निवडून जाणार आहेत. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीस प्रारंभ केला आहे. आगामी काही दिवसांत प्रभागातील वातावरण रंगणार आहे.
प्रचारास येणार वेग
जालना महापालिका निवडणुकीच्या प्रचारास आगामी काही दिवसांत वेग येणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रभागात कार्नर मिटिंग, बैठकांनी राजकीय वातावरण तापणार आहे. प्रभागात कोणत्या जातीची किती मते आहेत. कोणत्या भागात कोणाचे वर्चस्व आहे. याची माहिती इच्छुक घेत आहेत. आगामी काळात घोषणांचा पाऊस अन् आश्वासनाचा पूर प्रभागात वाहणार असल्याचे दिसत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंडाचा वापर होण्याची शक्यता आहे.