जालना ः शहरातील गुरुवार (15)रोजी महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी घराबाहेर पडलेल्या पंधरा मतदारांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेउन जखमी केल्याची घटना जुना जालन्यातील शनिमंदिर, काली मस्जीद, सरस्वती भुवन व इन्कमटॅक्स कॉलनी भागात घडली.
जालना शहरात महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी मोठ्या संख्येने मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले होते. यावेळी पिसाळलेल्या कुत्र्याने पंधरा मतदारांना लक्ष करीत त्यांना चावा घेतल्याने ते जखमी झाले. या प्रकारामुळे मतदारांची पळापळ झाली. यामुळे काही मतदारांनी मतदानास येणे टाळले. जखमी मतदारांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले.
गेल्या अनेक महिन्यांपासून शहरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा विषय गाजत असतानाच ऐन महापालिका निवडणुकीत थेट मतदारांवर हल्ला करीत पिसाळलेल्या कुत्र्याने जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले.