जालना मनपातील स्वीकृत सदस्यांवरून राजकारण रंगले pudhari photo
जालना

Jalna Municipal Corporation politics : जालना मनपातील स्वीकृत सदस्यांवरून राजकारण रंगले

सहा स्वीकृत सदस्य; भाजपा चार, शिवसेना व काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज

पुढारी वृत्तसेवा

जालना : जालना शहर महानगरपालिका येथे स्वीकृत (नामनिर्देशित) सदस्यांच्या निवडीसाठी सोमवारी पार पडलेल्या नामनिर्देशन प्रक्रियेत एकूण 6 अर्ज दाखल झाले. यात भाजपाकडून चार तर शिवसेना व काँग्रेसकडून प्रत्येक एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. यामुळे जालना शहराचे राजकीय वातावरणाल रंग चढला आहे. येत्या 6 मार्च रोजी विशेष सभा होणार असून, चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, नगर सचिव विभागामार्फत सोमवार (दि. 2) रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया पार पडली. प्राप्त नामनिर्देशन पत्रांमध्ये सर्वाधिक अर्ज भारतीय जनता पक्षाकडून दाखल झाले आहेत. भाजपचे 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, इतर पक्षांच्या तुलनेत भाजपने आघाडी घेतली आहे. याशिवाय शिवसेनेचा 1 आणि काँग्रेसचा 1 उमेदवाराने अर्ज सादर केला आहे.

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड ही प्रशासनिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. या सदस्यांद्वारे विविध समित्यांमध्ये प्रतिनिधित्व मिळत असल्याने सर्वच पक्षांनी या प्रक्रियेकडे विशेष लक्ष दिले आहे.

जालना शहर महानगरपालिकेची विशेष सभा शुक्रवार, दि. 6 मार्च रोजी सकाळी 11 वाजता महानगरपालिका प्रशासकीय इमारतीमधील नवीन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. महापौर श्रीमती वंदना अरुण मगरे यांच्या मान्यतेने नगरसचिव सुप्रिया चव्हाण यांनी या सभेची सूचना निर्गमित केली आहे.

दरम्यान, नामनिर्देशन अर्जांची छाननी बुधवार दि.4 रोजी पार पडणार आहे. अंतिम निवडीनंतर महानगरपालिकेच्या विविध समित्यांच्या स्थापनेला गती मिळणार आहे. या प्रक्रियेमुळे मनपाच्या कारभारात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जालना शहराच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

बुधवारी होणार अर्जाची छाननी

6 स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी नगरसचिव कार्यालयाकडून स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. 26 व 27 फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन पत्र वितरण करण्यात आले. 2 मार्च रोजी पत्र स्वीकारण्यात आले. 4 मार्च रोजी दुपारी 12 वाजता पासून अर्जांची छाननी आयुक्तांच्या माध्यमातून केली जाणार आहे.

मनपाच्या विशेष सभेत या विषयावर चर्चा

  • येत्या शुक्रवार दि. 6 रोजी विशेष सभा बोलवण्यात येणार आहे. या सभेत स्वीकृत सदस्य निवड: महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि नियम 2012 नुसार, नवनियुक्त पालिका सदस्यांव्यतिरिक्त 6 (सहा) नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्यांचे नामनिर्देशन करणे.

  • स्थायी समिती सदस्य नियुक्ती: अधिनियमातील कलम 31 अ नुसार प्रमाणशीर प्रतिनिधित्व देऊन नामनिर्देशनाद्वारे स्थायी समितीमधील 16 सदस्यांची नियुक्ती करणे.

  • विशेष व प्रभाग समित्यांची स्थापना : महिला व बाल कल्याण समितीसह इतर आवश्यक विशेष समित्या आणि प्रभाग समित्यांची स्थापना करणे.

  • इतिवृत्त कायम करणे: दि. 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या विशेष सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. आदी विषयावर चर्चा केली जाणार आहे.

भाजपाकडून चार स्वीकृत सदस्यांचे नामनिर्देशन

  • भारतीय जनता पार्टीच्या वतीने जालना महानगरपालिकेतील चार स्वीकृत सदस्यपदासाठी सोमवार (दि.02) रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. यात अर्जुन कबुलमल गेही, शोभा गोपाल नारियलवाले, आनंद शिवआप्पा, सिद्धिविनायक वसंतराव मुळे आदींचा समावेश आहे.

  • यावेळी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेशजी राऊत आणि भाजपा मनपा गटनेते महेश निकम, माजी जिल्हा सरचिटणीस देविदास देशमुख, राजेश जोशी, जिल्हा सरचिटणीस सुनील पवार, नगरसेवक सुजित जोगस, नेमीचंद भुरेवाल, शिवराज नारीयलवाले, रणजीत मगरे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT