जालना ः शहरातील विद्रुपीकरण थांबवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जालना शहर महानगरपालिकेने अनधिकृत होर्डिंग, बॅनर आणि पोस्टरविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. शहरातील वीजेचे खांब, रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना लावण्यात आलेले सर्व जाहिरातीचे साहित्य 24 तासांच्या आत हटवण्याचे आदेश महापालिका आयुक्त आशिमा मित्तल यांनी दिले आहेत.
महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या जाहीर प्रगटनानुसार, नागरिक, संस्था, जाहिरातदार तसेच राजकीय पक्षांनी स्वतःहून 24 तासांत अनधिकृत होर्डिंग व बॅनर काढून घ्यावेत. निर्धारित मुदतीनंतरही साहित्य हटवले नाही, तर ते महानगरपालिकेकडून जप्त करण्यात येईल आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
या मोहिमेंतर्गत महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपणास प्रतिबंध अधिनियम 1995 चे कलम 3 तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमअंतर्गत गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
अनधिकृत होर्डिंगमुळे अपघात किंवा जीवितहानी झाल्यास संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल केला जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. शहराचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.