MSEDCL Pudhari
जालना

Jalna news | वीज कट केल्यावर चोरीचा उजेड!

अंबड, मंठा तालुक्यातील ४३ जणांवर गुन्हे

पुढारी वृत्तसेवा

जालना : वीजबिलाच्या थकबाकीपोटी कारवाई केल्यावरही काही ग्राहकांनी अनधिकृतरीत्या वीजपुरवठा जोडून महावितरणचे आर्थिक नुकसान केले. याप्रकरणी अंबड व मंठा तालुक्यातील ४३ जणांवर पोलिसांत वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. महावितरणच्या धडक कारवाईमुळे वीजचोरांत खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे याच आठवड्यात अशा प्रकरणांत ६२ जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे.

महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने, छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्या मार्गदर्शनाखाली व जालना मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय सरग, कार्यकारी अभियंता सोमनाथ मठपती नेतृत्वाखाली अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी अंबड व मंठा तालुक्यात वीजबिल थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची पडताळणी मोहीम राबवली.

अंबड ग्रामीण शाखेचे सहायक अभियंता नितीन चिंचणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोहिमे दरम्यान हरदखेडा, दहिपुरी, शेवगा, धनगर पिंपरी, खेडगाव येथील काही ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी खंडित केलेला असतानाही ते वीजचोरी करताना आढळले. मंठा-१ शाखेचे सहायक अभियंता प्रशांत शेटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी राबवलेल्या तपासणी मोहिमेत उमरखेडा, खारी आरडा, जुनी नानसी, मंगरूळ, मेसखेडा, तळतोंडी, रामतीर्थ येथे वीजचोरी करताना वीज ग्राहक आढळले. मंठा-२ शाखेचे कनिष्ठ अभियंता हर्षद अंभोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी राबवलेल्या मोहिमेत खोराड सावंगीत वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई केली. या ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी खंडित करण्यात आलेला होता त्यानंतरही ते वीज चोरी करून वीज वापरताना आढळून आले.

अंबड व मंठा तालुक्यांत घरगुती ग्राहकांसोबतच व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ४३ ग्राहकांना पथकाने वीजचोरी करताना पकडले. या ग्राहकांकडे ३३ लाख ७५ हजार रुपये एवढी वीजबिल थकबाकी आहे. ग्राहकांचे मीटर काढून वीजपुरवठा खंडित केल्यानंतर त्यांनी २६ हजार २१० युनिट वीजचोरी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT