Jalna Crime pudhari photo
जालना

Jalna Crime : छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन विद्यार्थिनीने जीवन संपवले

पीडित मुलीच्या काकांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

जालना : तरुणाच्या सततच्या छेडछाडीसह लग्नाच्या तगाद्याला कंटाळून अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना तालुका ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या काकांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

ग्रामीण भागातील पीडित मुलीच्या काकांनी ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घराशेजारी राहणारा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून पुतणीचा पाठलाग करत होता. तू माझ्याच समाजाची आहेस, आपण दोघे पळून जाऊन लग्न करू, असे म्हणून तो तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता.

सुमारे दीड महिन्यापूर्वी पीडित मुलीने हा प्रकार कुटुंबाला सांगितला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी सदर तरुणाला समज दिली होती. यावेळी मुलगी अल्पवयीन असुन, तिला पुढे शिक्षण घ्यायचे आहे. तिची लग्नाची इच्छा नाही. त्यामुळे तू तिला त्रास देऊ नको असे सदर तरुणाला मुलींच्या नातेवाईकांनी सांगीतले होते.

पीडित मुलगी ९ ऑक्टोबर रोजी दुपारी शिष्यवृत्तीचा फॉर्म भरून घरी परतली होती. दुपारी ४:०० वाजेच्या सुमारास ती आणि तिचा धाकटा भाऊ घरात असताना आरोपीने अचानक घरात घुसुन सदर मुलीला तू माझ्यासोबत लग्न का करत नाहीस, असे म्हणून धमकावले आणि तिच्या भावाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रसंगानंतर भाऊ बाहेर गेल्यानंतर, आरोपीचा सततचा त्रास व लग्नाच्या मागणीला आणि छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या काकांच्या जबाबावरुन नोंद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT