बदनापूर : तालुक्यातील सोमठाणा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २८) दुपारच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बदनापूर शहरातील हुसेन नगर परिसरातील शेख रेहान शेख बाबा (वय १७) हा आपल्या मित्रांसह सोमठाणा तलावात पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्यांच्यापैकी तिघे जण तलावाच्या खोल पाण्यात गेले. तलावात गाळ असल्याने रेहानचा पाय गाळात अडकल्याने तो पाण्यात बुडाला. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड केल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले.
स्थानिक नागरिकांनी रेहानचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरुवातीला त्याचा शोध लागण्यात अडचणी येत होत्या. त्यानंतर नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने सुमारे दोन ते तीन तास अथक प्रयत्न करून रेहानला पाण्याबाहेर काढले.
त्यानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे बदनापूर शहरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. या प्रकरणी बदनापूर पोलिसांनी माहिती घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे.