जालनाः अपहरण करून लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.  pudhari photo
जालना

Jalna Crime : अपहरण करून लुटणाऱ्या अट्टल टोळीला पोलिसांनी ठोकल्‍या बेड्या

साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त : चंदनझिरा पोलिसांची धडक कारवाई; ११ गंभीर गुन्हे दाखल असलेला ‘रावण’ गजाआड

पुढारी वृत्तसेवा

जालना : शहरातील एमआयडीसी भागात कंपनीतून घरी परतणाऱ्या एका सुपरवायझरला स्विफ्ट कारमध्ये जबरदस्तीने बसवून, मारहाण करत लुटमार करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला चंदनझिरा पोलिसांनी जेरबंद केले आहे. या घटनेतील तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि रोख रकमेसह एकूण ५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान, सुपरवायझर धर्मेंद्र रामनरेश यादव (रा. भवानी नगर, जालना) यांना २९ जुलै रोजी मारहाण करुन रोख रकमेसह ऑनलाईन असा एकूण ६२ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने लुटण्यात आला. याप्रकरणी ३० जुलै रोजी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुप्त माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार सचिन कैलास गायकवाड उर्फ रावण (वय २३, रा. एकता चौक, चंदनझिरा) आणि त्याचे साथीदार राणोबा उर्फ राणा भिकाजी तरकसे (वय २७, रा. कन्हैय्यानगर) व करण कृष्णा पवार (वय २५, रा. सिंधी काळेगाव) यांना शोधून बेड्या ठोकल्या. आरोपींकडून लुटलेल्या रकमेपैकी १२,३०० रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार (एमएच २१ व्ही ६३८६) आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

मित्रांकडून ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतलेले ३० हजार रुपये आरोपींच्या खात्यावर असल्याने ते जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई चंदनझिरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब पवार, सहाय्यक फौजदार मनसुब वेताळ, कृष्णा शिंदे, पोलीस हवालदार प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, अभिजीत वायकोस आदींनी केली.

‘रावण’वर ११, तर ‘राणा’ वर ६ गंभीर गुन्हे

मुख्य आरोपी सचिन ऊर्फ रावण हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर जालना शहर व जिल्ह्यात दरोडा, खुनाचा प्रयत्न, अवैध शस्त्र बाळगणे आणि मकोका (MCOCA) अंतर्गत तब्बल ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर त्याचा साथीदार राणोबा उर्फ राणा तरकसे याच्यावरही दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडीचे ६ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांच्या अभिलेखावरून समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT