जालना मर्चंट बँकेला गंडा घालणारा आरोपी जेरबंद pudhari photo
जालना

Jalna merchant bank fraud : जालना मर्चंट बँकेला गंडा घालणारा आरोपी जेरबंद

जालना आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई,आरोपीस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

जालना ः जालना मर्चंट बँकेला लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या संशयित आरोपी रायचंद सखाराम कुंरगळ यास आर्थिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर येथून अटक केली आहे. या कारवाईमुळे बँक फसवणुकीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून न्यायालयाने आरोपीस 8 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पंचमुखी वेअर हाऊसचे संचालक असलेल्या आरोपीने जालना मर्चंट बँकेसोबत करार करून शेतमाल गहाण ठेवण्याच्या नावाखाली बनावट पावत्या तयार केल्याचा आरोप आहे. या पावत्यांच्या आधारे बँकेच्या न्यू मार्केट यार्ड, भोकरदन, अंबड, टेंभुर्णी, गेवराई, मंठा आदी शाखांमधून कर्ज मंजूर करण्यात आले.

या प्रकारातून 177 कर्जदारांना कर्ज देण्यात आले असून त्यापैकी 133 खातेदार थकीत झाले आहेत.बँकेने नोटीस देऊनही संबंधित कर्जदार कर्ज भरत नसल्याने बँकेने नियमाप्रमाणे संबंधित कर्जदारांच्या मालाचा लिलाव करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली होती. मात्र संबंधित मालधारक कर्जदार व पंचमुखी वेअर हाऊसचे संशयित रायचंद सखाराम कुंरगळ यांनी अडथळा करून लिलाव होऊ दिला नसल्याचा आरोप आहे.

बँकेने पंचमुखी वेअर हाऊस येथे जाऊन मालधारक कर्जधारकांच्या मालाची पाहणी करण्याकरिता वेअर हाऊसचे मालक रायचंद सखाराम कुरंगळ यांना स्वत: भेटून संबंधित थकबाकीदार कर्जधारकांचा जमा माल पाहणी करण्यासाठी माल दाखवा असे सांगितल्यांनतर आज नाही नंतर दाखवतो असे म्हणून त्यांनी दोन महिन्यांपासून मालधारक कर्जधारकांचा जमा असलेला तारण माल दाखविण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे संबंधित कर्जदारांचा माल गोडाऊनमध्ये नसल्याचे समजले. माल गोदामात आढळून न आल्याने फसवणूक झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी बँकेच्यावतीने सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी व उपअधीक्षक सुरेश जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांच्यासह पथकातील पोलिस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के, पोलिस अंमलदार गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजानन भोसले, विष्णू कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रवींद्र गायकवाड, श्रेयस वाघमारे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

गोपनीय माहीतीव्दारे अटक

तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढून अहिल्यानगर जिल्ह्यातून संशयीत आरोपीस अटक केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT