जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवार (दि. २२) रोजी शेतमालाची मोठी आवक झाली असून, विविध पिकांना समाधानकारक भाव मिळाल्याचे चित्र दिसून आले. विशेषतः पांढऱ्या तुरीला ७ हजार ७५० रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा सर्वोच्च दर मिळाला, तर रेशीम कोशाने ६१ हजार ५०० रुपयांचा टप्पा ओलांडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
बाजार समितीकडून मिळालेल्या दैनंदिन आढाव्यानुसार, आज गहू (४९६) ची २५३२ क्विंटल आवक झाली असून, त्यास सरासरी २३०० रुपये दर मिळाला. ज्वारीची १५८६ क्विंटल आवक होऊन त्यास कमाल ४४०० रुपये भाव मिळाला. बाजरी आणि मका यांची आवकही समाधानकारक असून मक्याला किमान १२०० तर कमाल १८४० रुपये दर मिळाला आहे.
डाळवर्गीय पिकांमध्ये तुरीची मोठी आवक दिसून आली. पांढऱ्या तुरीला कमाल ७७५० तर लाल तुरीला ७५०० रुपये दर मिळाला. हरभऱ्याची (गावरान) १३७१ क्विंटल आवक झाली असून त्यास ५३२५ रुपयांपर्यंत भाव मिळाला, तर काबुल हरभऱ्याला ६५०० रुपयांचा दर मिळाला आहे. सोयाबीनची आवक ८३९ क्विंटल राहिली असून त्यास कमाल ५७०० रुपये दर मिळाला. बाजार समितीत आज एकूण ९७९२ क्विंटल शेतमालाची आवक झाली. असून, एकूण उलाढाल ३ कोटी ७५ लाख २४ हजार ३५० रुपयांच्या घरात पोहोचली असल्याची माहिती सचिव भरत तनपुरे आणि प्रशासक परमेश्वर वरखडे यांनी दिली.
मोसंबीची आवक घटली
फळबाजारात मोसंबीची आवक आज केवळ २३ क्विंटल इतकीच मर्यादित राहिली, त्यास कमाल २२४० रुपये भाव मिळाला. गुळाची आवकही कमी (१४ क्विंटल) असली तरी त्यास ४०५० रुपयांचा स्थिर भाव मिळाला आहे. आजच्या बाजार दिवसात फळ विभागात ३ लाख ९५ हजार ४०० रुपये इतकी उलाढाल झाली.
भाजीपाला विभागात पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली. कोथिंबिरीच्या १४७६ जुड्यांची आवक होऊन त्यास ७०० रुपये शेकडा असा दर मिळाला.
मेथी ६०० रुपये तर शेपू ३०० रुपये कमाल दराने विकली गेली. इतर प्रमुख भाज्यांमध्ये हिरवी मिरची ६००० रुपये, लसूण ७००० रुपये आणि आल्याला ५००० रुपये प्रति क्विंटलचा सर्वोच्च दर मिळाला.
भाजीपाला विभागात ४ लाख २७ हजार ४६६ रुपयांची एकूण उलाढाल झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे.
उन्हाळ्याचा जोर वाढल्याने फळबाजारात टरबूज, खरबूज आणि लिंबाला मोठी मागणी असून, लिंबाच्या दराने १२ हजार रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठला आहे. तर फळांचा राजा मानल्या जाणाऱ्या आंब्याचीही आज १४८ कॅरेट इतकी लक्षणीय आवक झाली. फळबाजारात सफरचंदाला ३४०० रुपये, तर संत्र्याला ९१०० रुपये प्रति क्विंटल कमाल भाव मिळाला.