परतूर : मंठा तालुक्यातील गुळखंड तांडा येथे जुन्या जागेच्या वादातून दोन गटात झालेल्या भीषण हाणामारीत एका ५४ वर्षीय व्यक्तीचा चाकूने वार करून निर्घृण खून करण्यात आला, तर त्यांचा मुलगा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाउसाहेब रावसाहेब राठोड (वय ५४) असे मृताचे नाव असून, त्यांचे मुलगा नवनाथ राठोड हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी अलका नवनाथ राठोड आणि आरोपी यांच्यात गावातील एका मोकळ्या जागेवरून मागील १५ दिवसांपासून वाद सुरू होता. बुधवारी सकाळी अलका यांचे सासरे भाउसाहेब राठोड आणि आजेसासरे रावसाहेब सिताराम राठोड हे आरोपी साईनाथ राठोड याच्या दुकानासमोर उभे असताना त्यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी पडली. यावेळी आरोपी रावसाहेब राठोड, साईनाथ राठोड, संतोष राठोड यांच्यासह घरातील इतर सदस्य हातात चाकू, लाठ्या आणि दगड घेऊन आले. आरोपींनी 'तुला आता प्लॉटच देतो' असे म्हणून शिवीगाळ करत भाउसाहेब यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी साईनाथ राठोड याने आपल्या हातातील चाकूने भाउसाहेब यांच्या पोटावर खोलवर वार केले.
वडिलांचा ओरडण्याचा आवाज ऐकून मुलगा नवनाथ राठोड आणि सून हे धावून आले असता, आरोपींनी नवनाथ यांच्यावरही जीवघेणा हल्ला चढवला. सोहन आणि संतोष राठोड यांनी 'यालाही जिवंत सोडू नका' असे म्हणत नवनाथ यांच्या पोटावर, पाठीवर आणि मांडीवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात नवनाथ हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या अलका राठोड आणि सुरेखा राठोड यांनाही आरोपींनी काठी आणि दगडाने मारहाण करून जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाप-लेकांना दवाखान्यात नेल्यास बघून घेण्याची धमकी देत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली.
जखमींना तातडीने जालना येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी भाउसाहेब राठोड यांना मृत घोषित केले, तर नवनाथ राठोड यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अलका राठोड यांच्या फिर्यादीवरून रावसाहेब राठोड, साईनाथ राठोड, संतोष राठोड, सोहन राठोड, रितेश राठोड, विराट राठोड, सह दोन महिला यांच्याविरुद्ध खुनाचा आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.