वडीगोद्री-अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तुर पिकाला मोठा फटका बसत आहे. तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीने आक्रमण केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावर्षी पावसामुळे सोयाबीन, कापसाचे पीक हातचे गेले असतानाच थोडी आशा असलेले तुरीचे पिकही वाया जाणार की काय, असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे.
जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला यावर्षी नैसर्गीक संकटांचा सामना करावा लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन, मूग, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यांचे तूर पिकही शेंगा पोखरणाऱ्या अळीमुळे धोक्यात आले आहे. या अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. परिसरातील शेतकरी महागड्या किटकनाशकांची दोन ते तीन वेळा फवारणी करून देखील काही फरक पडत नसल्याचे सांगत आहेत. फुलगळती आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. शेतकरी फवारणीविषयी एकमेकांना विचारणा करीत आहे. खरिपात सोयाबीन, मूग तसेच कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तूर पिकावर शेतकऱ्यांची मदार आहे. यातून केलेला खर्च निघेल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहे. परंतु महागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही फुलगळती रोखण्यात यश येत नसल्याचे चित्र आहे. सोयाबीन, कापूस हे पीक हातचे गेल्यानंतर इतर पिकांची जोपासना करण्यासाठी शेतकरी प्रयत्नात आहेत. मात्र बदलत्या वातावरणामुळे ही पिके सध्या सलाईनवर आहेत. तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाली आहे. अंबड तालुक्यातील वडीगोदी परिसरात अंतरवाली सराटी, नालेवाडी, धाकलगाव, पाथरवाला बुद्रुक, पाथरवाला खुर्द, धाकलगाव, टाका, दूनगाव, रामगव्हान, दोदडगाव, भांबेरी, दह्याला आदी भागात तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. ढगाळ वातावरणामुळे महागडी कीटकनाशकांची फवारणी करून पीक वाचविण्याचा शेतकरी आटोकाट प्रयत्न करत आहेत. मात्र फारसा फायदा होत नसल्याने मोठ्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच सोयाबीन, मूग, कापसाच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने अद्यापही मदत केली नसल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखीच वाढली आहे.