Jalna rainfall update pudhari photo
जालना

Jalna rainfall update : जिल्ह्यात पावसाची उघडीप, जलसाठे जैसे थे

खरिपाच्या उर्वरित पेरणीला आला वेग, मोठ्या पावसाची गरज

पुढारी वृत्तसेवा

जालना : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिकांच्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर व मका पिकांच्या पेरणीकडे मोर्चा वळविला आहे. दमदार पावसाअभावी जिल्ह्यातील सात मध्यम व ६० लघु सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा अद्याप समाधानकारक झालेला नसल्याने भविष्यातील पाणी उपलब्धतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात १ जूनपासून ११जुन पर्यंत सरासरी २१४.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस अपेक्षित पावसाच्या ११२.२ टक्के असला, तरी वार्षिक सरासरीच्या तुलनेत तो केवळ 35.6 टक्के इतकाच आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात १४५.९ मिमी पाऊस झाला होता.

जिल्ह्यात परतूर तालुक्यात २३३.८ मिमी, बदनापूर २३२.२ मिमी, जालना २४२.५ मिमी, तर अंबडमध्ये २१६.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे मंठा १९८.२ आणि घनसावंगी १९० मिमी या तालुक्यांत तुलनेने कमी पाऊस झाला आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, पावसातील उघडीपमुळे शेतकऱ्यांनी पेरणीची कामे जलदगतीने सुरू केली आहेत. मात्र, ७ मध्यम व ६० लघु तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप मुसळधार पाऊस न झाल्याने मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणी पातळीत वाढ झालेली नाही. परिणामी आगामी काळात पावसाने पुन्हा दडी मारल्यास खरीप हंगामासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात यंदा अलनिनोच्या पार्श्वभुमीवर कमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानंतर पेरणी योग्य पाऊस झाल्याचने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. मात्र सध्या पावसाने उघडीप दिल्यामुळे पावसाचे वेळेवर आगमन न झाल्यास खरीपाची कोवळी पिके धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चिंता कायम

जालना जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाने उघडीप दिली आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतात पेरणीसह खत देण्यासह पिकांच्या आंतर मशागतीला वेग आला आहे. मोठे पाऊस नसल्याने विहिरी व बोअरच्या पाणी पातळीत वाढ न झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता कायम असल्याचे दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT