जालना : जिल्ह्यात सन 2025-26 च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाकडून घोषित करण्यात आलेली मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे. पीक कापणी प्रयोगातील त्रुटी आणि विम्याच्या रकमेतील तफावत दूर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शुक्रवार, दि.17 रोजी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन केले.
या संदर्भात जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी तातडीने बैठक आयोजित करावी, अशी मागणी त्यांनी केली. सुमारे 2 लाख 63 हजार शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा आणि 10 हजार शेतकऱ्यांनी फळपिकांचा विमा उतरवला होता. यासाठी शेतकऱ्यांनी 40 कोटी रुपयांचा हिस्सा भरला आहे.
जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून उत्पादनात मोठी घट झाली आहे. मात्र, कृषी विभागाने नुकसान झाल्यानंतर 15 दिवसांनी उशिरा पीक कापणी प्रयोग राबवल्याचा खळबळजनक आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यावेळी गजानन उगले, राजेंद्र शिंगारे, सुखदेव चंद, महादेव सावळ आदी शेतकरी उपस्थित होते.
सॅटेलाइट फोटोंवरही आक्षेप
एमआरएसएसीच्या छायाचित्रांमध्ये पिके वरून हिरवी दिसत असली तरी, अतिवृष्टीमुळे पिकांच्या फळधारणेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे उपग्रहाद्वारे घेतलेल्या फोटोंचा आणि जमिनीवरील प्रत्यक्ष नुकसानीचा कोणताही संबंध नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.